मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात ताज हॉटेल असावे, अशी इच्छा व्यक्त करताच ताज ग्रुपने तातडीने त्याला मान्यता दिली आणि नागपुरात नवीन ताज हॉटेल उभारण्याची अधिकृत घोषणा केली. तसेच, ताज ग्रुपकडून नागपुरात आणखी एका जिंजर हॉटेलच्या उभारणीचीही घोषणा करण्यात आली आहे.

मुंबईत भूमिपूजनाच्या कार्यक्रमात मोठी घोषणा
मुंबईतील वांद्रे येथे नव्या ताज हॉटेलच्या भूमिपूजन समारंभात मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपुरात ताज हॉटेलची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यांच्या या विनंतीला ताज ग्रुपने केवळ काही मिनिटांत सकारात्मक प्रतिसाद देत नागपुरात भव्य हॉटेल उभारण्याचा निर्णय घेतला. नागपूरकरांसाठी ही मोठी आनंदवार्ता असून, लवकरच शहरात ताज ग्रुपच्या भव्य हॉटेलचे स्वागत करता येणार आहे.
नागपूरच्या पर्यटन आणि व्यवसायाला नवी चालना
ताज ग्रुपच्या या निर्णयामुळे नागपूरच्या पर्यटन क्षेत्राला आणि व्यावसायिक प्रतिष्ठेला मोठी चालना मिळेल. आधीपासूनच नागपुरात एक जिंजर हॉटेल कार्यरत आहे, आणि आता दुसऱ्या जिंजर हॉटेलच्या उभारणीमुळे शहरातील पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्राला नवी उंची मिळणार आहे.
मुंबईच्या विकासात ताज ग्रुपचा महत्त्वाचा वाटा
वांद्रे येथे नव्या ताज हॉटेलच्या भूमिपूजन प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (ताज ग्रुप) चे आभार मानले. त्यांनी सांगितले की, “हे हॉटेल रतन टाटा यांच्या हृदयाच्या जवळचे होते. त्यांनी एकदा या प्रकल्पासंबंधी काही अडचणी सांगितल्या होत्या, परंतु आता या हॉटेलमुळे मुंबईच्या सौंदर्यात भर पडणार आहे.”
जागतिक दर्जाचे आतिथ्यसेवा अनुभव
ताज ग्रुपने आतिथ्यसेवा आणि लक्झरी हॉटेल्सच्या क्षेत्रात नवा मानक तयार केला आहे. अनेक देशांमध्ये ताज हॉटेल्स असून, या हॉटेल्समुळे भारताची ओळख जगभरात अधिक ठळक झाली आहे. “विदेशातही ताज हॉटेल्समध्ये गेल्यावर आपण भारतात असल्याचा अनुभव मिळतो,” असे फडणवीस म्हणाले.
आणखी हॉटेल्सच्या विस्तारासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन
मुख्यमंत्री फडणवीस यांनी ताज ग्रुपला महाराष्ट्रात आणखी हॉटेल्स उभारण्याचे आवाहन केले. “रतन टाटा यांच्या हयातीत हा प्रकल्प पूर्ण झाला असता, तर त्यांना विशेष आनंद झाला असता. विकास प्रकल्पांसाठी आम्ही ताज ग्रुपच्या सोबत आहोत. भविष्यातही ताज ग्रुपने आणखी हॉटेल्स उभारावीत, अशी आमची अपेक्षा आहे,” असे ते म्हणाले.
नागपूरमधील नव्या ताज हॉटेलच्या घोषणेमुळे शहरातील पर्यटन, व्यवसाय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्व अधिक वाढणार आहे.