राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर नांदेडमध्ये त्यांचा भव्य सत्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमात भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते. या मंचावर त्यांनी एकीकडे राम शिंदेंच्या कार्याचा गौरव केला, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.

चव्हाण म्हणाले की, “राम शिंदेंचा प्रशासकीय अनुभव मोठा आहे. त्यांनी ग्रामपंचायतीपासून ते मंत्रिपदापर्यंतची वाटचाल केली आहे. आज ते सभापतीच्या पदावर पोहोचले आहेत, ही गोष्ट खूप मोठी आहे.” ते पुढे म्हणाले की, “जे कोणी मुंबईच्या काळबादेवी परिसरात गाडी चालवू शकतात, ते कुठेही गाडी चालवू शकतात, तसंच जे कोणी अहमदनगरसारख्या जिल्ह्यातून निवडून येतात, त्यांचं राजकारण कुठेही यशस्वी होऊ शकतं.”
या कार्यक्रमात चव्हाणांनी त्यांच्या कर्जत-जामखेड दौऱ्याचा उल्लेख करत रोहित पवारांवर अप्रत्यक्ष टोला लगावला. “तेव्हा मी दुसऱ्या पक्षात होतो आणि रोहित पवारांनी मला आमंत्रित केलं होतं. तेव्हा स्थानिक नागरिक माझ्या कानात सांगत होते की, ‘खरा नेता तर इथे राम शिंदेंच आहे,'” असं चव्हाण म्हणाले.
तसेच, नांदेडमध्ये कृषी विद्यापीठ उभं करावं, यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचाही त्यांनी उल्लेख केला. त्यांनी सांगितलं की, मुख्य सचिवांनी हा प्रस्ताव नाकारला होता, पण त्यांनी सांगितलं की निर्णय मुख्यमंत्री घेतात, सचिव नव्हे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी यावर नकारात्मक टिप्पणी केली होती. सरकार बदलल्यानंतर आमदार बालाजी कल्याणकर यांनी ही फाईल पुढे नेली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळात हा प्रकल्प मंजूर झाला, असेही त्यांनी नमूद केलं.