राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते नरेंद्र राणे परत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळाले आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला होता, मात्र तिथे त्यांचे मन रमले नसल्याची चर्चा आहे.

सुनील तटकरे यांच्यासोबत बैठक – प्रवेश लवकरच?
नरेंद्र राणे आणि त्यांचे भाऊ दिनकर तावडे यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भेट घेतली. त्यामुळे त्यांच्या पुनरागमनाची शक्यता आणखी बळावली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांच्या पक्षप्रवेशास अद्याप अधिकृत मंजुरी मिळालेली नसली तरी, तो लवकरच होण्याची दाट शक्यता आहे.
विधानसभेपूर्वी केलेली बंडखोरी – आता परतीचे वेध
विधानसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र राणे यांनी अजित पवार गटाला सोडून शरद पवार गटात प्रवेश केला होता. त्यावेळी हा मोठा राजकीय धक्का मानला गेला होता. मात्र, आता महायुतीच्या वाढत्या प्रभावामुळे अनेक नेते पुन्हा माघारी फिरण्याच्या तयारीत आहेत.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचाली
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी ही राजकीय उलथापालथ होत आहे. निवडणुकीच्या तोंडावर असे पक्षांतर अनेक घडू शकतात. आता नरेंद्र राणे यांच्या पुनरागमनामुळे अजित पवार गटाला बळ मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
त्यांचा पक्षप्रवेश कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.