राज्यात गाजत असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर अखेर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा राजीनामा सोपवण्यात आला असून, तो स्वीकारल्याचेही समजते. या पार्श्वभूमीवर काल रात्री देवगिरी बंगल्यावर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उपस्थिती लावत मुंडे यांना राजीनामा देण्याचे निर्देश दिले. शेवटी आज सकाळी धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
अजित पवारांचा संयत प्रतिसाद
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता त्यांनी अधिक भाष्य करण्यास टाळाटाळ केली. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले, “तुम्हाला काहीच माहिती नाही… उगीच काही विचारू नका… मी विधानभवनात चाललोय, तिथे गेल्यावर बोलेन.”
या उत्तरावरून अजित पवार काहीसे अस्वस्थ असल्याचे जाणवले. त्यांचा चेहरा आणि देहबोली नेहमीसारखी नव्हती. त्यातच पत्रकारांनी वारंवार प्रश्न विचारल्याने ते किंचित चिडल्याचेही पाहायला मिळाले.
राजकीय हालचालींना वेग
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. महायुतीतील आणि विरोधकांकडून या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. आता सरकार या संपूर्ण प्रकरणावर पुढे काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.