महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजवत अखेर मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर तब्बल दोन महिन्यांपासून त्यांच्यावर वाढता दबाव होता. सीआयडीच्या आरोपपत्रानुसार या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचे स्पष्ट झाले आहे, जो मुंडे यांचा निकटवर्तीय मानला जातो.

रात्री उशिरा झालेल्या बैठकीत मोठा निर्णय
गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणावरुन राजकीय वातावरण तापले होते. काल रात्री ‘देवगिरी’ बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, मंत्री धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा चर्चेचा मुख्य विषय होता. अखेर आज सकाळी त्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला.
मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, “धनंजय मुंडे यांनी आज आपला राजीनामा माझ्याकडे दिला आहे. मी तो स्वीकारून पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे. त्यांना मंत्रीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे.”
अजित पवार यांची प्रतिक्रिया टाळण्याचा प्रयत्न
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, विधान भवनाकडे जात असताना पत्रकारांनी अजित पवार यांना या विषयावर विचारले असता त्यांनी “मी विधान भवनात चाललो आहे, तिथे गेल्यावर सांगतो” असे म्हणत उत्तर देण्याचे टाळले.
पुढील राजकीय परिणाम काय?
या घटनेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. विरोधकांचा सरकारवर दबाव वाढला असून, संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा पुढील तपास काय दिशा घेईल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.