राज्यातील राजकारणात मोठा उलथापालथ होत, अखेर मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर तब्बल 82 दिवसांनी त्यांनी हा निर्णय घेतला. राजीनाम्याची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्यात आली असून, त्यांचे स्वीय सहाय्यक (PA) ही प्रत सागर बंगल्यावर घेऊन गेले आहेत.

राजकीय दडपण आणि वाढता विरोध
संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी विरोधकांकडून सातत्याने राजीनाम्याची मागणी केली जात होती. नुकतेच CID च्या दोषारोपपत्रातील काही पुरावे समोर आल्याने समाज माध्यमांवर मोठी प्रतिक्रिया उमटली होती. सामान्य नागरिकांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत अनेकांनी कठोर भूमिका घेतली होती. त्यामुळे मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा कालपासूनच रंगली होती. अखेर आज त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सोपवला.
मुख्यमंत्र्यांकडून राजीनामा स्वीकृत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारल्याची घोषणा केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, हा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात आला आहे आणि मुंडे यांना अधिकृतरित्या पदमुक्त करण्यात आले आहे.
विधानभवनात तीव्र आंदोलने
या संपूर्ण घटनेवरून विधानभवनात जोरदार आंदोलने पाहायला मिळाली. विरोधकांनी ‘महायुतीचे गुंडे’ अशा घोषणा देत सरकारवर निशाणा साधला. दुसरीकडे, समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्या विधानांचा निषेध म्हणून सत्ताधारी गटाने देखील आंदोलन केले.
पुढील राजकीय परिणाम काय?
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर पुढे काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाचा राजकीय परिणाम किती मोठा होईल, हे लवकरच स्पष्ट होईल.