भगवानगडाचे प्रमुख महंत नामदेव शास्त्री यांनी पुन्हा एकदा माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या पाठिशी उभं राहत सर्वांना त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांच्या गालावरून वारं गेल्यामुळे सध्या वाणी थांबली आहे, अशी माहिती देत शास्त्रींनी मुंडे लवकर बरे व्हावेत यासाठी सर्वांनी एकत्र प्रार्थना करावी असं म्हटलं आहे.

नामदेव शास्त्रींची भावना व्यक्त
एका कार्यक्रमात बोलताना महंत नामदेव शास्त्री म्हणाले की, “मी जेव्हा फेटा बांधण्यासाठी गेलो होतो, तेव्हा मला फोन आला होता की आपल्या बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र धनंजय मुंडे कार्यक्रमाला येणार आहेत. त्यांनी हेलिकॉप्टरजवळ दोन तास प्रतीक्षा केली पण क्लिअरन्स न मिळाल्याने त्यांना कार्यक्रमात सहभागी होता आलं नाही.”
त्यांनी पुढे सांगितलं की, “धनंजय मुंडे यांच्या गालावरून वारं गेलं आहे. त्यामुळे त्यांच्या वाणीला अडथळा आला आहे. अशी चांगली वाणी पुन्हा सुरू व्हावी आणि ते पहिल्या स्थानावर पोहोचून समाजसेवा करावी यासाठी भगवान बाबांची प्रार्थना सर्वांनी एकत्रितपणे करायला हवी.”
भगवान गडाबद्दलही दिला संदेश
गडावरील वातावरणाबद्दल बोलताना नामदेव शास्त्री यांनी स्पष्ट केलं की, “गडावर सर्वजण एकोप्याने राहतात. इथे कोणतीही फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका. हा वारकरी संप्रदाय आहे, जो जातीपातीच्या पलीकडे आहे. जे खरंच कल्याण साधू इच्छितात त्यांनीच गडावर यावं.”
यावेळी ते अधिक ठामपणे म्हणाले की, “गडासोबत कुठल्याही प्रकारची छेडछाड करू नका. भगवान बाबा जेव्हा पाहतात तेव्हा ते मायाळूपणाने प्रेम देतात, पण जर ते रागावले तर त्यांचा प्रकोप देखील भयंकर असतो. त्यांच्या काठीचा आवाज जरी ऐकू येत नाही, तरी त्यामुळे संपूर्ण जीवन उद्ध्वस्त होऊ शकतं. याचे साक्षीदार हजारो लोक झाले आहेत.”
चर्चेला उधाण
नामदेव शास्त्री यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या इशाऱ्याचा रोख नेमका कोणाकडे होता, यावर वेगवेगळे अंदाज व्यक्त होत आहेत. सध्याच्या परिस्थितीत त्यांनी दिलेल्या संदेशातून एकीकडे मुंडेंबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे, तर दुसरीकडे भगवानगडाच्या शुचिता आणि प्रतिष्ठेच्या रक्षणाचा इशारा दिला आहे.
संपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी आणि ते पुन्हा राजकीय क्षेत्रात सक्रीय व्हावेत, यासाठी भगवानगडावरून एक वेगळाच सकारात्मक संदेश दिला गेल्याचं दिसून येत आहे.