बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. सीआयडीने दाखल केलेल्या दोषारोपपत्रात मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित वाल्मिक कराड हा या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा उल्लेख केला आहे. यानंतर या प्रकरणाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया देत धनंजय मुंडेंवर थेट आरोप केले आहेत. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “या प्रकरणात राजकीय दबाव होता आणि तो धनंजय मुंडेंचा होता. सुरुवातीपासूनच मी सांगत होते की, मुंडेंचा राजीनामा झाला पाहिजे. आता हे स्पष्ट झाले आहे की, हे वेगवेगळे गुन्हे नव्हते, तर एकाच मोठ्या कटाचा भाग होते.”
हत्या कटाचा खुलासा
अंजली दमानियांनी सांगितले की, या प्रकरणाची सुरुवात 29 नोव्हेंबरला झाली होती. खंडणी, ॲट्रॉसिटी आणि हत्या—ही तिन्ही प्रकरणे एकमेकांशी जोडलेली होती. सुदर्शन घुलेच्या फोनवरून वाल्मिक कराडने संतोष देशमुख यांना ठार मारण्याचा कट रचल्याचे तपासातून उघड झाले आहे.
याशिवाय, 6 डिसेंबरला झालेल्या हल्ल्यात आरोपींवर कठोर कलमे लावण्यात आली होती, परंतु त्यांची सुटका करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. 7 डिसेंबरला झालेल्या संभाषणात संतोष देशमुख यांचा खून करण्याची चर्चा झाल्याचे पुरावे समोर आले आहेत.
अंजली दमानियांची मागणी
दमानियांनी या प्रकरणात दोन मोठ्या मागण्या केल्या आहेत. एक म्हणजे, वाल्मिक कराडला फाशीची शिक्षा द्यावी, आणि दुसरी म्हणजे, धनंजय मुंडेंनी तात्काळ राजीनामा द्यावा. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना देखील आव्हान दिले की, जर नैतिकता असेल, तर मुंडेंना तातडीने पदावरून हटवावे.
आरोपींच्या वकिलांचे स्पष्टीकरण
यावर आरोपींचे वकील राहुल मुंडे यांनी प्रतिक्रिया देत सांगितले की, 1400 पानी दोषारोपपत्राचे संपूर्ण विश्लेषण करायला वेळ लागतो. त्यांनी स्पष्ट केले की, आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावे तपासणे आवश्यक आहे आणि केवळ मीडियाच्या दाव्यावर विश्वास ठेवता येणार नाही.
हे प्रकरण आता गंभीर वळणावर आहे. राजकीय दबाव, पोलिस तपास आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे आरोप यामुळे पुढील काही दिवसांत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.