मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभर वाढलेल्या दबावाच्या पार्श्वभूमीवर अखेर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पहिलं ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मुंडेंच्या ट्विटची मुख्य ठळक मुद्दे –
- “मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येतील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्यापासूनची ठाम भूमिका आहे. काल समोर आलेले फोटो पाहून माझं मन व्यथित झालं.”
- “या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून, आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशी प्रस्तावित आहे.”
- “माझ्या सदसद् विवेकबुद्धीला स्मरून आणि प्रकृतीच्या कारणास्तव मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.”
राजीनाम्याच्या निर्णयामागचं कारण?
मुंडेंनी आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट केलं की, गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे डॉक्टरांनी उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे राजकीय आणि वैद्यकीय कारणास्तव त्यांनी मंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं.
82 दिवसांनंतर राजीनामा, राजकीय हालचालींना वेग
संतोष देशमुख हत्या प्रकरण उघड झाल्यानंतर मागील 82 दिवसांपासून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत होती. अखेर काल रात्री देवगिरी बंगल्यावर झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर मुंडेंनी राजीनामा दिला, ज्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे.
आता पुढील तपासात कोणते नवे खुलासे समोर येतात आणि मुंडेंच्या भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत काय निर्णय होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.