
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना स्पष्ट संदेश दिला आहे – अंतर्गत वाद विसरून एकजुटीने काम करा. नुकत्याच झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले, “वीस वर्षांनी आम्ही दोन भाऊ एकत्र येऊ शकतो, तर मग तुम्ही एकमेकांमध्ये वाद का घालता? पक्षासाठी एकोप्याने काम करा, वाद विसरा आणि निवडणुकीच्या तयारीला लागा.” त्यांनी स्पष्ट केलं की, योग्य वेळी योग्य सूचना दिल्या जातील.
मतदार यादीवर विशेष भर
निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेताना त्यांनी मतदार यादीच्या कामावरही भर देण्याच्या सूचना दिल्या. “जुने कार्यकर्ते, पदाधिकारी यांना सोबत घ्या. मतदार यादी तपासा आणि त्यावर विशेष लक्ष केंद्रित करा,” असे ते म्हणाले.
सत्ता आपलीच येणार
मुंबई महापालिकेत मनसेच सत्तेवर येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “हे टाळ्या वाजवण्यासाठी नाही, तर माझा विश्वास आहे की मनसे हा सर्वात बलवान पक्ष आहे. जुने कार्यकर्ते, पक्षापासून दूर गेलेल्यांनाही पुन्हा सोबत घ्या,” असे आवाहन त्यांनी केलं.
मराठीच्या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट
मराठी भाषेच्या मुद्द्यावरही राज ठाकरेंनी पक्षाच्या भूमिकेचं स्पष्टीकरण दिलं. “मराठी शिकायला कोणी तयार असेल, तर त्याला शिकवा. उर्मट बोलत नसेल, तर वाद नका घालू. पण जर कोणी उर्मटपणा दाखवला, तर त्यानुसार भूमिका घ्या,” असा इशारा त्यांनी दिला. तसेच, अशा प्रसंगांचे व्हिडिओ न काढण्याचाही सल्ला त्यांनी पुन्हा दिला.
मेळाव्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही प्रतिक्रिया देताना सांगितलं की, “राजसाहेबांनी दिलेला एकतेचा संदेश सगळ्यांना पूर्वीपासूनच माहित आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं – जर आम्ही दोघे भाऊ एकत्र येऊ शकतो, तर तुम्हीही एकत्र राहा.”