पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी भाषेच्या आणि प्रादेशिक अस्मितेच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला जाहीर इशारा दिला.
राज ठाकरे म्हणाले, “देशाचे गृहमंत्री अमित शहा म्हणतात, ‘मी हिंदी भाषिक नाही, मी गुजराती आहे’. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री – दोघेही गुजरातचे. मग आम्ही, मराठी लोक, आमच्या हक्कांसाठी बोललो तर संकुचित कसे? गुजरातमध्ये अनेक प्रकल्प गेले – डायमंड प्रकल्पही. प्रत्येकाला आपल्या राज्याविषयी प्रेम असतं, पण मराठी माणूस आवाज उठवला की तो संकुचित होतो का?”

ते पुढे म्हणाले, “माझ्याकडे शिक्षणमंत्री दादा भुसे हिंदी सक्तीच्या विषयावर बोलायला आले होते. मी त्यांना विचारलं – गुजरातमध्ये हिंदी सक्ती आहे का? त्यांनी ‘नाही’ असं उत्तर दिलं. मग महाराष्ट्रातच का ही सक्ती? सरकार काय डाव खेळतंय हे समजून घ्या.”
राज ठाकरे यांनी यावेळी गुजरातमधील बिहारी लोकांवरील कारवाईचा मुद्दाही उपस्थित केला. “गुजरातमध्ये पहिल्यांदा 20 हजार बिहारींना हकललं गेलं. त्यानंतर आणखी अशा अनेक घटना घडल्या,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
शालेय शिक्षणातील हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाला झालेला विरोध, आणि तो रद्द करण्याची वेळ सरकारवर का आली, याचा मागोवा घेत राज ठाकरे यांनी भाजप सरकारला जाब विचारला.
या भाषणातून राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं की, जर मराठी भाषा आणि जमीन गेली, तर महाराष्ट्रात मराठी माणसाला स्थान राहणार नाही. त्यामुळे प्रत्येक मराठी व्यक्तीने जागृत राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.