सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियानच्या मृत्यूप्रकरणी तिचे वडील सतीश सालियान यांनी दिलेल्या जबाबाची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिस आणि एसआयटी अधिकाऱ्यांकडे नोंदवलेल्या जबाबात त्यांनी काही महत्त्वाचे खुलासे केले आहेत.

त्या महिलेला पैसे का दिले?
सतीश सालियान यांनी सांगितले की, ते आपल्या एका दिवंगत मित्राच्या पत्नीला आर्थिक अडचणीमुळे मदत करत होते. त्यांनी आणि त्यांच्या मित्राने लोणचं बनवण्याचा व्यवसाय सुरू केला होता. मात्र, त्या मित्राच्या निधनानंतर लॉकडाऊनमध्ये त्याच्या कुटुंबाला अडचण येऊ नये म्हणून त्यांनी किराणा खर्चासाठी पैसे दिले होते.
दिशाला गैरसमज का झाला?
दिशाला या पैशांच्या व्यवहाराबद्दल संशय होता. तिच्या वडिलांनी तिच्या सांगण्यावरून थेट खात्यातून पैसे देणं बंद केलं होतं. मात्र, तिच्या वडिलांचे व्हॉट्सअप संदेश तिच्या लॅपटॉपवरदेखील वळते (sync) झाले होते. त्यामुळे ते अजूनही पैसे देत असल्याचा तिचा समज झाला, आणि यावरून त्यांच्यात वाद झाला होता.
मृत्यूच्या 6 दिवस आधी काय घडलं?
2 जून 2020 रोजी दिशाने वडिलांशी पैशांवरून भांडण केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोविड काळात घरात पैशांची कमतरता असूनही वडिलांनी पैसे दिल्याने दिशा नाराज होती.
दिशा आत्महत्या नव्हे, तर हत्या – वडिलांचा आरोप
सतीश सालियान यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली असून, दिशाची आत्महत्या नव्हे, तर बलात्कार करून हत्या झाली असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी या प्रकरणात आदित्य ठाकरे, सूरज पांचोली आणि डिनो मोरियावर आरोप लावले आहेत. मृत्यूनंतर पाच वर्षांनी दाखल केलेली ही याचिका नव्या वादाला तोंड फोडणार आहे.