दिल्ली विधानसभा निवडणुकीत तब्बल 27 वर्षांनंतर भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या निकालानंतर भाजपला राजधानीत एकहाती सत्ता मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विजयावर प्रतिक्रिया देत दिल्लीच्या जनतेचे आभार मानले आहेत आणि भविष्यात आणखी जोमाने काम करण्याचे आश्वासन दिले आहे.

दिल्ली निवडणुकीत भाजपचा वरचष्मा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राजधानी दिल्लीतही राजकीय वातावरण तापले होते. भाजप आणि आम आदमी पक्ष यांच्यात रंगलेल्या चुरशीच्या लढतीत भाजपने बाजी मारली. या निवडणुकीत भाजपने 47 जागांवर विजय मिळवला, तर आम आदमी पक्ष केवळ 23 जागांवरच समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे, काँग्रेसला एकही जागा मिळू शकली नाही. यामुळे तब्बल 27 वर्षांनंतर दिल्लीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असून, पक्षाची सत्ता प्रबळ झाली आहे.
पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया
निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून प्रतिक्रिया दिली. त्यांनी दिल्लीच्या जनतेचे आभार मानत विकास आणि सुशासनाचा विजय झाल्याचे सांगितले.
पंतप्रधान मोदींनी काय म्हटले?
“जनशक्ती सर्वोच्च! हा विकासाचा आणि सुशासनाचा विजय आहे. दिल्लीतील जनतेने आम्हाला जो विश्वास आणि प्रेम दिले, त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. आम्ही दिल्लीत चौफेर विकास करू आणि लोकांचे जीवन अधिक सुकर बनवण्यासाठी कोणतीही कसूर सोडणार नाही. हा आमचा दृढ संकल्प आहे. तसेच, विकसित भारताच्या दिशेने दिल्लीत महत्त्वाची भूमिका बजावेल, याची आम्ही खात्री देतो.”
या निवडणुकीतील विजयामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, आगामी काळात राजधानीच्या विकासासाठी सरकार कोणते नवे निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.