दिल्लीच्या राजकारणात सध्या घडामोडींना वेग आलेला आहे. संसदेत पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

या दोन्ही भेटींचा वेळ आणि पार्श्वभूमी पाहता, या केवळ औपचारिक नाहीत, असं अनेकांचे मत आहे. विशेषतः दोन्ही जबाबदार पदांवर असलेले नेते एकाच दिवशी राष्ट्रपतींकडे जातात, तेव्हा त्यामागे काही ना काही महत्त्वाचं कारण असतं, असं राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, सध्याच्या अधिवेशनात अनेक महत्त्वाची विधेयके मांडली जाण्याची शक्यता आहे. “समान नागरी संहिता” (UCC), “एक देश, एक निवडणूक”, यांसारख्या मोठ्या विषयांवर संसदेत चर्चा होऊ शकते. त्यामुळे या निर्णयांपूर्वी राष्ट्रपतींना माहिती देण्याचाच हा प्रयत्न असू शकतो.
दुसरीकडे, काश्मीरमध्ये अलीकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर लष्कराकडून मोठी कारवाई सुरू आहे. तसेच ईशान्य भारतात बांगलादेशी घुसखोरीचे प्रश्न उभे राहत आहेत. हे सर्व मुद्दे लक्षात घेता, केंद्र सरकारने आपली भूमिका राष्ट्रपतींना स्पष्ट केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच काही माध्यमांनी उपराष्ट्रपतींच्या संभाव्य निवडणुकीबाबतही चर्चेचा भाग असल्याचं म्हटलं आहे. ही भेट एखाद्या संवैधानिक नियुक्तीसंदर्भातही झाली असू शकते.
या भेटींनंतर अधिकृतपणे सरकारकडून कोणतंही निवेदन आलेलं नसल्यामुळे चर्चांना अजूनच बळ मिळालं आहे. काही जणांनी सोशल मीडियावर या हालचालींना “नवीन गेम प्लॅन” असंही म्हटलं आहे.
सध्या तरी या भेटींचे नेमके कारण स्पष्ट झालं नसले तरी, हे संकेत देतात की केंद्र सरकार काहीतरी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.