दिल्लीतील एका स्नेहभोजन कार्यक्रमामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना नेते आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आपल्या निवासस्थानी खासदारांसाठी विशेष स्नेहभोजन आयोजित केले होते. या कार्यक्रमाला ठाकरे गटाच्या तीन खासदारांनी हजेरी लावल्याने राजकीय समीकरणांबाबत नवी चर्चा सुरू झाली आहे.

या स्नेहभोजनाला परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे उपस्थित होते. या अनपेक्षित उपस्थितीमुळे राजकीय गोटात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
याचवेळी, काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. या घटनेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांवर नाराजी व्यक्त केली होती. ठाकरे गट आणि संजय राऊत सातत्याने शिंदेंवर टीका करत असताना, त्यांच्या गटातील खासदार शिंदे गटाच्या मंत्र्याच्या स्नेहभोजनाला उपस्थित राहतात, याकडे अनेकांचे लक्ष वेधले जात आहे.
याशिवाय, शिंदे यांच्या सत्कार सोहळ्यात संजय दिना पाटील यांची उपस्थिती देखील चर्चेचा विषय ठरली आहे. या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात नव्या समीकरणांची शक्यता व्यक्त केली जात आहे.