गडचिरोली जिल्ह्यात शिक्षणमंत्री आणि शिंदे गटाचे नेते दादा भुसे यांच्या दौऱ्यानंतर शिवसेनेच्या (शिंदे गट) अंतर्गत गटबाजीचा उद्रेक झाला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीनंतर दोन जिल्हाप्रमुखांमध्ये श्रेयवादावरून चांगलाच वाद झाला आणि त्याचे रूप चक्क मारहाणीमध्ये बदलले.

गडचिरोली जिल्ह्यातील सर्किट हाऊसमध्ये मंत्री दादा भुसे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांशी बैठक घेतली. या बैठकीनंतर ते चंद्रपूरकडे रवाना होताच गडचिरोली जिल्हाप्रमुख संदीप ठाकूर आणि अहेरी जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांच्यात जोरदार वाद झाला. प्रारंभी शाब्दिक चकमक सुरु झाली, मात्र काही क्षणांतच हातघाईवर येण्याची वेळ आली. उपस्थित स्थानिकांनी हस्तक्षेप करत हा वाद थांबवण्याचा प्रयत्न केला.
या घटनेमुळे शिंदे गटातील अंतर्गत कलह पुन्हा एकदा उघड झाला आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, येत्या स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा घटनांमुळे पक्षाची प्रतिमा डागाळू शकते आणि मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यात अजून एक दु:खद घटना घडली. काटली गावाजवळ सकाळी व्यायाम करणाऱ्या सहा तरुणांना भरधाव ट्रकने चिरडले. त्यात दोन जण जागीच ठार झाले, तर इतर चार जण गंभीर जखमी झाले. यातील दोघांचा मृत्यू रुग्णालयात झाला असून उर्वरित दोघांना नागपूरला हेलिकॉप्टरद्वारे हलवण्यात आले आहे.
या भीषण अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी नागपूर मार्गावर ५ तास रास्ता रोको केला. या वेळी शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी स्वत: घटनास्थळी येऊन ग्रामस्थांची समजूत घातली आणि प्रशासनाला तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. मात्र या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.