जम्मू-काश्मीरमधील शांततापूर्ण डोंगररांगांमध्ये पुन्हा एकदा रक्तरंजित हल्ला घडला आहे. पहलगाममध्ये झालेल्या या भीषण दहशतवादी हल्ल्यात 26 निरपराध नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या घटनेंनी संपूर्ण देशात शोक आणि संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्रातील सहा नागरिकांसह दोन विदेशी नागरिकांचाही या हिंसाचारात मृत्यू झाला आहे.

या घटनेनंतर राजकीय वर्तुळातही प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध करत एक ठाम भूमिका मांडली आहे. “जर गरज भासली तर पाकिस्तानात घुसा, पण या दहशतवाद्यांचा कायमचा बंदोबस्त करा,” असं आवाहन त्यांनी केलं आहे.
रोहित पवारांनी हा मुद्दा केवळ राजकारणापुरता मर्यादित ठेवलेला नाही, तर त्यांनी समाजमनाचा सूर पकडत म्हटलं, “दहशतवाद्यांना ना जात असते ना धर्म. काहीजण या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत, पण हे पूर्णतः चुकीचं आहे. मदत करणारेही अनेक मुस्लिम होते. त्यामुळे आपण एकजुटीनं दहशतवादाविरोधात उभं राहणं गरजेचं आहे.”
हल्ल्यानंतर केंद्र सरकारनेही कडक पावलं उचलली आहेत. पाकिस्तानच्या विरोधात विविध स्तरांवर कारवाई करण्यात आली आहे. सिंधू पाणी करार तात्पुरता स्थगित करण्यात आला असून, अटारी बॉर्डरही बंद करण्यात आलं आहे. पाकिस्तानातील नागरिकांना व्हिसा नाकारण्यात येत आहे, तसेच भारतात असलेल्या पाकिस्तानी अधिकाऱ्यांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयांचा पाकिस्तानवर मोठा परिणाम होणार असल्याचं स्पष्ट आहे.
दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी बंद पाळण्यात आला. अनेक भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली. सुरक्षा यंत्रणांनी देखील मोठी कारवाई करत सुमारे दीड हजार लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
ही घटना केवळ भारतासाठीच नव्हे, तर जागतिक स्तरावरही चिंतेचा विषय ठरत आहे. शांततापूर्ण पर्यटनस्थळी असा हल्ला होणं ही गंभीर बाब आहे. अशा वेळी देशातील प्रत्येक नागरिकाने एकजुटीने आणि परखडपणे दहशतवादाचा निषेध करणे गरजेचे आहे.