राज्याचे नवे कृषीमंत्री म्हणून दत्तात्रय भरणे यांनी आज पदभार स्वीकारला. माजी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या रमी खेळण्याच्या वादग्रस्त व्हिडीओनंतर त्यांची उचलबांगडी झाली आणि भरणेंना या खात्याची जबाबदारी देण्यात आली. पदभार स्वीकारल्यानंतर भरणे यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मला ज्ञात आहेत, म्हणूनच हे खाते माझ्याकडे देण्यात आले, असे स्पष्ट केले. “शेतकऱ्यांच्या हितासाठी मी ठोस निर्णय घेईन,” असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर भरणे म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी मला स्पष्ट सांगितले की राज्यातील प्रत्येक भागात जाऊन शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्या, मी तुमच्या पाठीशी उभा राहीन.” यावेळी त्यांनी कृषी विभागातील MPSC उत्तीर्ण १४ उमेदवारांच्या नियुक्ती पत्रावर तत्काळ स्वाक्षरी केली, यामुळे त्यांच्या कार्यशैलीत तत्परता दिसून आली.
दरम्यान, महसूल दिनानिमित्त इंदापूर येथे एका भाषणात केलेल्या विधानामुळे भरणे चर्चेत आले. त्यांनी म्हटले की, “सरळ काम सगळेच करतात, पण एखादं काम वाकडं करून परत सरळ केलं जातं, तर ती माणसं लक्षात राहतात.” या विधानामुळे अधिकाऱ्यांमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण होते आणि काहींनी यावर आश्चर्य व्यक्त केले.
दत्तात्रय भरणे यांची कारकीर्द सहकार चळवळीपासून सुरू झाली. पुण्याच्या इंदापूर तालुक्यात जन्मलेले भरणे यांनी वाणिज्य शाखेत पदवी घेतल्यानंतर १९९२ मध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून काम सुरू केलं. पुढे ते जिल्हा बँकेचे अध्यक्ष, आणि साखर कारखान्याचे प्रमुख बनले. २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांनी पहिली विधानसभा निवडणूक जिंकली, २०१९ मध्ये पुन्हा निवडून आले आणि महाविकास आघाडीत मंत्री झाले.
२०२३ मध्ये पक्षात फूट पडल्यावर त्यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिला. २०२४ च्या निवडणुकीत त्यांनी इंदापूर मतदारसंघातून पुन्हा विजय मिळवला आणि आता कृषीमंत्री पदाची धुरा त्यांच्याकडे आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या समस्या सुटतील, अशी अपेक्षा निर्माण झाली आहे.