धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आणि तो स्वीकारला गेला. या राजीनाम्यावर संपूर्ण राज्यभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असताना, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीही तीव्र शब्दांत भाष्य केले आहे.

‘उशिरा का होईना, पण निर्णय झाला’
मनोज जरांगेंनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “संपूर्ण चार्जशीट झाल्यानंतरच राजीनामा देण्यात आला. तो आधीच द्यायला हवा होता. ही फक्त राजकीय नाटकबाजी आहे. ‘तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो’ अशा प्रकारचं हे नाट्य होतं.” त्यांनी सरकारवरही आरोप करत म्हटले की, “राजकीय गुंडगिरी करणाऱ्या मित्रांना वाचवण्याचं काम यामध्ये केलं गेलं.”
‘फडणवीस आणि अजित पवार यांचे आभार’
जरांगेंनी आपल्या भाषणात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलही उल्लेख केला. “उशिरा का होईना, पण त्यांचे आभार मानायला हवेत. त्यांनी मुंडेंना लाथ घालून बाहेर काढलं,” असे ते म्हणाले. त्यांनी हेही नमूद केले की, “आम्ही काल राजीनाम्याची मागणी केली आणि आज तो देण्यात आला. हे अहंकार आणि मग्रुरीच्या जोरावर लोकांना संकटात टाकणारे नेते आता पाताळात जाणार आहेत.”
‘राजकीय मग्रुरीमुळे पतन अटळ’
जरांगेंनी थेट शब्दांत आरोप करत म्हटले की, “इतक्या मोठ्या घटनेनंतरही जर कोणाला पश्चात्ताप होत नसेल, तर त्यांचे भविष्य निश्चितच अंधकारमय आहे. या मग्रुरीमुळे त्यांची सत्ता संपुष्टात येईल. त्यांच्या अहंकारामुळे त्यांचीच लंका बुडणार आहे.”
‘मराठ्यांनी सावध राहावे’
त्यांनी पुढे मराठा समाजाला थेट आवाहन करत सांगितले, “आता सरकारच्या या नाटकांवर विश्वास ठेवू नका. मराठ्यांनी त्यांना मोठं करू नये. आपले अधिकार आणि हक्कांसाठी अधिक सावध राहून पुढे जावं.”
मनोज जरांगेंच्या या प्रतिक्रियेमुळे राज्यात नवीन राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल येत्या काही दिवसांत आणखी घडामोडी घडण्याची चिन्हे आहेत.