जळगाव – जळगावच्या किनगाव-जळगाव मार्गावरील रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे भूमिपूजन जलसंपदा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी निवडणुकीदरम्यानची परिस्थिती, समाजातील चर्चा आणि स्वतःच्या मनातील संभ्रमावस्था याबाबत मोकळेपणाने आपली भावना व्यक्त केली.

सगळे म्हणायचे – गुलाबराव यावेळी संपले!
गुलाबराव पाटील म्हणाले, “तेव्हाही वातावरण असंच होतं… लोक म्हणायचे – गुलाबराव यावेळी नाही निवडून येणार. मलाही खात्री नव्हती. पण मतदारांनी, विशेषतः महिलांनी मला भरभरून पाठिंबा दिला. अनेकांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला पुन्हा संधी दिली.”
“लाडकी बहिण काँग्रेसची होती, पण…”
ते पुढे म्हणाले, “महायुती यावेळी एकदिलाने लढली. विरोधकांची गळचेपी झाली. काही लोक माझ्याबाबत शंका व्यक्त करत होते, पण शेवटी जनतेच्या प्रेमामुळे मी निवडून आलो. अगदी माझ्या लाडक्या बहिणीनेही, जरी ती काँग्रेसची असली तरी, 1500 रुपये पाहून माझ्याच चिन्हाला मत दिलं, असं हसतहसत त्यांनी सांगितलं.”
मंत्री होईन का, हेही माहित नव्हतं – पण…
पाटील यांनी स्पष्ट केलं की, “मला मंत्रीपद मिळेल का, याचीही गॅरंटी नव्हती. कारण मागणी करणारे अनेक, आणि निवडून येणारेही खूप. तरीसुद्धा माझ्या नशिबात मंत्रीपद होतं, आणि मला संधी मिळाली.” त्यांनी अभिमानाने सांगितलं की, “जळगाव जिल्ह्याच्या 11 पैकी 11 जागा महायुतीने जिंकल्या. विरोधकांचं खातंही उघडलं नाही.”
महिलांचा भक्कम पाठिंबा – सरकारही पाठीशी
या निवडणुकीत महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान करून महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचंही त्यांनी नमूद केलं. “महिलांसाठी सरकारने अनेक उपयुक्त योजना आणल्या असून, त्यांच्यासोबत सरकार ठामपणे उभं आहे,” असंही ते म्हणाले.