राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होणार असून ते चार आठवडे चालणार आहे. यापूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विरोधकांनी नेहमीप्रमाणे चहापानावर बहिष्कार टाकला असला, तरी त्यांनी राज्याच्या विकासासंदर्भातील मुद्द्यांवर चर्चा करावी, असे त्यांनी सुचवले आहे.

“विरोधासाठी विरोध नको” – शिंदे यांचा टोला
पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लक्ष्य करताना म्हटले की, “राज्यातील जनतेने आम्हाला लँडस्लाईड विजय दिला आहे. विरोधकांनी केवळ विरोधासाठी विरोध न करता, शेतकऱ्यांच्या आणि लोकांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करावे.”
त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधताना सांगितले की, “विरोधकांनी आम्हाला पराभूत करण्यासाठी अनेक मार्ग शोधले, पण जनतेने त्यांचा खरा चेहरा ओळखून योग्य निर्णय घेतला. विरोधकांची संख्या कमी होत आहे. आता त्यांनी आत्मपरीक्षण करावे.”
“विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत”
महायुती सरकारच्या कामगिरीवर बोलताना शिंदे म्हणाले, “महाविकास आघाडी सत्तेसाठी एकत्र आली होती, पण आम्ही जनतेच्या विकासासाठी एकत्र आलो आहोत. गेल्या अडीच वर्षांत आम्ही १४३ सिंचन प्रकल्प पूर्ण केले. आगामी अर्थसंकल्पातही विकासाला प्राधान्य दिले जाईल.”
“सगळं थंडा कूल कूल आहे”
महायुतीमध्ये वाद असल्याच्या चर्चांवर उत्तर देताना शिंदे म्हणाले, “म्हणे कोल्ड वॉर सुरू आहे, पण इथे सगळं थंडा कूल कूल आहे. आमच्या सरकारमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. विरोधकांनी निवडणुकीतील पराभव स्विकारून पुढे बघावे.”
यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याच्या विकासाला चालना देणारे निर्णय होतील, असे संकेत देत शिंदे यांनी विरोधकांना “तेच तेच रडगाणं सोडून विकासाच्या चर्चेत सहभागी होण्याचा” सल्ला दिला.