२६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वुर राणा सध्या भारताच्या ताब्यात असून त्याच्या मूळ गावाची चर्चा जोरात सुरु आहे. मात्र, हे गाव चर्चेत असण्यामागचं कारण दहशतवादाशी संबंधित नसून, पिण्याच्या पाण्याशी संबंधित गंभीर संकट आहे.

पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात असलेलं चीचा वतनी हे तहव्वुर राणा याचं गाव आजारांनी त्रस्त आहे. सुमारे पाच हजार लोकसंख्येच्या या गावातील पाण्यात घातक रसायनं आढळून आली असून त्यामुळे अनेक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पाण्यात घातक रसायनांचं प्रमाण अत्यंत धोकादायक
गावातील भूजलात आर्सेनिक आणि टोटल डिसॉल्वड सॉलिड्स (TDS) चे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेच्या मर्यादेपेक्षा शेकडो पट अधिक आहे. एका चाचणीत आढळले की, पाण्यात आर्सेनिकचे प्रमाण ५० ते २०० मायक्रोग्रॅम प्रति लीटर आहे, जे की सुरक्षित मर्यादेपेक्षा (१० मायक्रोग्रॅम) कितीतरी अधिक आहे. तसेच TDS चे प्रमाण देखील ६९९ ते २,२३० PPM पर्यंत आहे, जे मानवाच्या शरीरासाठी अत्यंत अपायकारक आहे.
गावकऱ्यांना विविध आजारांचा त्रास
गावातील अस्वच्छ पाण्यामुळे अनेक जण त्वचाविकार, पचन विकार, आणि गंभीर स्वरूपाच्या आजारांनी त्रस्त झाले आहेत. एका रुग्णाच्या तपासणीत आर्सेनिकमुळे कॅन्सरचा संशय आल्यामुळे हा प्रश्न उचलून धरला गेला. यानंतर सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन आणि इतर यंत्रणांची झोप उडाली. आतापर्यंत सुमारे २५० पेक्षा जास्त नागरिक विविध आजारांनी बाधित झाले आहेत.
पिण्याच्या पाण्याची टंचाई – RO प्लांटचा एकमेव आधार
गावात यापूर्वी बंद पडलेला RO वॉटर प्लांट आता पुन्हा कार्यान्वित करण्यात आला असून दररोज केवळ २,००० लिटर पाणी पुरवले जात आहे. स्थानिक प्रशासनाने हँडपंप आणि विहीरींच्या पाण्याचा वापर थांबवण्याचे आदेश दिले आहेत. आरोग्य कर्मचारी गावात जाऊन जनजागृती करत आहेत.
ही समस्या नैसर्गिक – प्रदूषणामुळे नाही
प्रशासनाच्या म्हणण्यानुसार ही समस्या औद्योगिक प्रदूषणामुळे नाही, तर नैसर्गिक आहे. खोल पातळीवर खोदकाम केल्यास पाण्यातील घातक घटक कमी प्रमाणात सापडले आहेत. सध्या दीर्घकालीन उपाय म्हणून सार्वजनिक पाणीपुरवठा योजना तयार करण्यात येत आहे, असे उपायुक्त इम्तियाज खिची यांनी स्पष्ट केले आहे.