डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर आयोजित कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाबासाहेबांविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. “बाबासाहेब हे केवळ संविधानाचे शिल्पकार नव्हते, तर माणुसकीच्या मूल्यांचेही अधिष्ठान होते. त्यांच्या विचारांमुळेच आज आपल्याला न्याय, समानता आणि स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार मिळतो,” असे त्यांनी म्हटले.

एकनाथ शिंदे म्हणाले, “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं जे स्मारक उभं राहत आहे, ते जगभरासाठी गौरवाची बाब ठरेल. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनीच सर्वसामान्य माणसालाही देशाच्या सर्वोच्च स्थानावर पोहोचण्याची संधी मिळते. याच संविधानामुळे एका शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला आणि आदिवासी भगिनी राष्ट्रपती बनली – हीच बाबासाहेबांची क्रांती आहे.”
कार्यक्रमात त्यांचं भाषण होणं अपेक्षित होतं, मात्र काही कारणास्तव ते होऊ शकलं नाही. यावर विचारल्यावर त्यांनी सांगितलं, “भाषण न होणं हा प्रश्न नाही. मला बाबासाहेबांचं दर्शन घेणं महत्त्वाचं वाटतं. त्यांच्या समाधीस्थळावर उपस्थित राहणं, त्यांना अभिवादन करणं, हेच खऱ्या अर्थाने मोठं आहे.”
शिंदे यांनी सांगितलं की, “आपल्या जीवनात बाबासाहेबांचा एक तरी गुण आत्मसात केला, तर आपलं आयुष्य अधिक अर्थपूर्ण बनेल. त्यांच्या शिकवणुकीतून प्रेरणा घेणं आणि समाजासाठी काम करणं, हाच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.