ठाण्याचे माजी खासदार आणि शिवसेना (ठाकरे गट) नेते राजन विचारे यांनी ठाण्याचे सध्याचे खासदार नरेश म्हस्के यांना एक खरमरीत पत्र लिहिलं आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये सुरू असलेल्या शाब्दिक चकमकीनंतर आता राजकीय वाद अधिक तीव्र झाल्याचं दिसतंय.
विचारे यांनी काही दिवसांपूर्वी नरेश म्हस्के यांच्यावर टीका करताना त्यांना “बच्चा” असं संबोधलं होतं. यावर प्रत्युत्तर देताना म्हस्के यांनी विचारे यांना “आजोबा” म्हटलं होतं. या टोलेबाजीमुळे दोन्ही गटांमध्ये तणाव वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर आता राजन विचारे यांनी एक पत्र लिहून नरेश म्हस्के यांना थेट एकेरी उल्लेख करत जाहीर इशारा दिला आहे.

सिंदूर ऑपरेशनवरील विचारे यांच्या विधानावरून शिंदे गटाने ठाण्यात मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी केली होती. हे बॅनर काढण्यावरून काल रात्री ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या युवासेनेत रस्त्यावरच बाचाबाची झाली. या प्रकारामुळे वातावरण तापलेलं असतानाच आता राजन विचारे यांच्या पत्रामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
विचारे यांच्या पत्रात मस्केंना उद्देशून थेट शब्दांत टीका करण्यात आली आहे. ठाण्यातील राजकीय समीकरणांमध्ये या वादामुळे पुन्हा एकदा ठिणगी पडली असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जाते.