महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) प्रमुख उद्धव ठाकरे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा दौरा तीन दिवसांचा असून, 6 ऑगस्ट रोजी त्यांनी दिल्लीत पाऊल ठेवले आहे. या दौऱ्यात ठाकरे विविध राजकीय नेत्यांची भेट घेणार असून इंडिया आघाडीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत सहभाग नोंदवणार आहेत.

ठाकरे दिल्लीत दाखल होण्याआधीच एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. त्यांच्या पक्षाच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 4 ऑगस्ट रोजी दिल्लीत भेट घेतली. ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे. विशेष म्हणजे, ही भेट ठाकरे यांच्या दौऱ्याआधी झाली आहे, त्यामुळे या भेटीचे अनेक अर्थ लावले जात आहेत.
या भेटीनंतर प्रियांका चतुर्वेदी यांनी स्पष्ट केले की, “ही भेट पूर्णपणे सहज होती. त्यात महाराष्ट्राशी किंवा राजकीय चर्चेशी संबंधित कोणतीही गोष्ट झालेली नाही. उद्धवजी दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीला सहभागी होणार आहेत आणि याआधीच माझी मोदीजींशी सहज भेट झाली,” असे त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यात त्यांचा कार्यकम अतिशय व्यस्त आहे. 6 ऑगस्ट रोजी संध्याकाळी ते खासदार शरद पवार यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर रात्री उशिरा पक्षाच्या खासदारांची एक महत्त्वाची बैठक घेतली जाईल. दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 ऑगस्ट रोजी सकाळी पत्रकार परिषद, संसद भवनातील पक्ष कार्यालयाला भेट, व दुपारी काही राजकीय भेटीगाठी अशी वेळापत्रक आखण्यात आली आहे. संध्याकाळी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या डिनरला आणि INDIA आघाडीच्या बैठकीतही ठाकरे सहभागी होणार आहेत.
या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या एका खासदाराची पंतप्रधानांशी गुप्त भेट ही निव्वळ योगायोग आहे की मोठ्या राजकीय बदलाचे संकेत? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.