शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप करत दावा केला आहे की, दोन मर्सिडीजच्या मोबदल्यात पद दिले गेले. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वातावरण तापले असून, यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या आरोपांना प्रतिउत्तर देताना ठाम भूमिका मांडली आहे. पुण्यात पत्रकार परिषद घेत त्यांनी गोऱ्हेंवर जोरदार टीका केली. अंधारे म्हणाल्या, “नीलम गोऱ्हे यांनी पुरावे सादर करावेत, अन्यथा त्यांनी माफी मागावी. नाहीतर मला काही सत्य बाहेर काढावे लागेल.”
नीलम गोऱ्हेंवर गंभीर आरोप
सुषमा अंधारे यांनी गोऱ्हेंच्या राजकीय प्रवासावर प्रकाश टाकत सांगितले की, “त्यांनी सुरुवात एसएफआयमधून केली, नंतर भारिपमध्ये प्रवेश घेतला. प्रकाश आंबेडकर यांच्या सहाय्याने त्यांना ओळख मिळाली. मात्र, त्यांनी अनेकदा गद्दारी केली – आधी आंबेडकरांशी, नंतर पवार साहेबांशी, आणि आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.”
याशिवाय, त्यांनी गोऱ्हेंच्या संपत्तीबद्दलही संशय व्यक्त करत, “त्यांच्याकडे २५० कोटींची मालमत्ता आहे, त्याचे सोर्स काय?” असा सवाल केला.
साहित्य संमेलन आणि वादग्रस्त विधान
अंधारे यांनी साहित्य संमेलनात गोऱ्हेंच्या सहभागावरही प्रश्न उपस्थित केला. “या संमेलनात सहभागी होण्यासाठी किमान साहित्यिक योगदान असायला हवे. मग त्यांना निमंत्रण का देण्यात आले?” असा टोला त्यांनी लगावला.
मानहानीचा दावा दाखल होणार?
यासोबतच, ठाकरे गट गोऱ्हेंच्या आरोपांवर कायदेशीर पातळीवर उत्तर देण्याच्या तयारीत आहे. “आम्ही मानहानीचा दावा दाखल करू. हा दावा किती कोटींचा असेल, हे लवकरच स्पष्ट होईल,” असेही अंधारे म्हणाल्या.
ठाकरे कुटुंब आणि राजकीय संबंध
यावेळी अंधारे यांनी स्पष्ट केले की, “राज आणि उद्धव ठाकरे हे भाऊ आहेत. ते कितीही वेळा भेटू शकतात. हे त्यांचे कौटुंबिक नाते आहे, राजकीय कट नाही.”
या आरोप-प्रत्यारोपांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, पुढील काही दिवसांत या वादाला आणखी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.