भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना (ठाकरे गट) आणि खासदार संजय राऊत यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. त्यांच्या मते, ठाकरे गट पुन्हा सत्तेत येण्यासाठी धडपडतोय, पण त्यांना कोणताही राजकीय पाठिंबा मिळत नाही. त्यामुळेच संजय राऊत वारंवार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करत असल्याचं पाटील म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, जर ठाकरे गटाने देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांच्यासोबत युती केली नाही, तर आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांना उमेदवारही मिळणार नाहीत. ही एक प्रकारची राजकीय अडचण असल्याचा इशारा त्यांनी दिला.
चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं की, अमित शाह यांच्याबद्दल संजय राऊत जे बोलतात ते निराधार आहे. शाह लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांवर 500 पानांचं अभ्यासपूर्ण पुस्तक प्रकाशित करणार आहेत. ते पुस्तक वाचल्यानंतर राऊत यांना शाह यांचा इतिहासाचा सखोल अभ्यास लक्षात येईल, असंही ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील सामाजिक योजना आणि आरक्षण धोरण याचेही पाटील यांनी कौतुक केलं. ते म्हणाले की, फडणवीस यांनी आरक्षण नसतानाही मराठा समाजासाठी वसतीगृहे, शैक्षणिक सुविधा आणि भत्त्यांसारख्या योजना राबवल्या. त्यामुळे मराठा, ओबीसी आणि दलित समाज त्यांच्या विरोधात जाणं शक्य नाही.
राजकीय अस्थिरतेबाबत बोलताना त्यांनी शिवसेनेतील नेत्यांच्या पक्षांतराचाही उल्लेख केला. मुंबईतील 57 नगरसेवक शिंदे गटात गेले आणि पुण्यातील काही भाजपमध्ये आले, याकडे लक्ष वेधत त्यांनी राऊत यांना पक्ष सांभाळण्याचा सल्ला दिला. महायुतीत सध्या चांगले वातावरण आहे आणि सर्व घटक एकत्रितपणे कार्य करत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.