मुंबई महापालिका निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे राजकीय हालचालींना वेग आला आहे. यातच आज एक मोठा झटका उद्धव ठाकरे गटाला बसला. त्यांचा विश्वासू मोहरा – रामदास कांबळे – यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. त्यामुळे मुंबईतील राजकारण पुन्हा ढवळून निघालं आहे.

रामदास कांबळे हे सायन प्रतीक्षा नगर भागातून शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक होते. त्यांनी प्रभाग समिती अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. शिवाय, युवासेनेतही त्यांना महत्त्वाची भूमिका दिली गेली होती. त्यामुळे त्यांचा शिंदे गटात झालेला प्रवेश हा केवळ एक राजकीय बदल नसून, तो ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जातोय.
शिंदे गटाची ही एक रणनीतीच मानली जात आहे. महापालिकेतील माजी नगरसेवक, विशेषतः ठाकरे गटातील कार्यकर्ते, यांना आपल्या बाजूला वळवून शिंदे गट मुंबईत आपली ताकद वाढवत आहे. आजवर सुमारे 123 माजी नगरसेवक शिंदे गटात सामील झाले असून, हे सर्वजण विविध टर्ममध्ये निवडून आलेले आहेत.
या घडामोडींमुळे उद्धव ठाकरे यांनी थेट डॅमेज कंट्रोलसाठी स्वत: मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. मातोश्रीवरून तातडीने बैठकांचे आयोजन झाले. मुंबईवर आपला मजबूत पकड टिकवण्यासाठी ठाकरे गट आता अधिक आक्रमक रणनीती आखण्याच्या तयारीत आहे.
भाजप आणि शिंदे गटाने मिळून महापालिकेवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तर दुसरीकडे, ठाकरे गटासाठी हा मोठा राजकीय आव्हान ठरणार आहे.
आगामी निवडणुकांत मुंबईतील सत्ता कोणाच्या बाजूने झुकते, यावर महाराष्ट्रातील राजकारणाचा पुढचा प्रवास ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक हालचाल, प्रत्येक प्रवेश आता अधिक महत्वाचा ठरत आहे.