शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी गोऱ्हेंवर पक्षातील उमेदवारी देण्यासाठी आर्थिक देवाणघेवाण केल्याचा दावा केला आहे. या आरोपांवर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अशोक हरनावळ यांनी नीलम गोऱ्हेंना थेट इशारा दिला आहे.

हरनावळ म्हणाले, “मी एक साधा शिवसैनिक आहे. रिक्षाचालक म्हणून सुरुवात करून नगरसेवक पदापर्यंतचा प्रवास केला आहे. माझ्यासाठी समाजकार्य हे ८० टक्के आणि राजकारण २० टक्के इतकंच महत्त्वाचं आहे. पैशाच्या लोभापोटी अनेक जण पक्ष बदलतात, पण माझं तसं नाही. नीलम गोऱ्हे कशा प्रकारच्या राजकारणात आहेत हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काही बोलण्यापूर्वी त्यांनी विचार करावा.”
यासोबतच, हरनावळ यांनी आपल्या कार्यकाळातील चार संपर्क नेत्यांचा उल्लेख केला – नीलम गोऱ्हे, गजानन किर्तीकर, उदय सामंत, आणि अमोल कोल्हे. मात्र, त्यांनी फक्त दोन नेत्यांची नावं स्पष्ट घेतली आणि त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “जर उद्धव ठाकरे यांच्याविषयी काही वक्तव्य केलं, तर माझ्याकडे असलेल्या माहितीच्या आधारे पुराव्यानिशी मी सत्य समोर आणेन,” असा स्पष्ट इशारा हरनावळ यांनी दिला.
या संपूर्ण घडामोडींमुळे शिवसेना (ठाकरे गट) आणि नीलम गोऱ्हे यांच्यातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.