अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून येणाऱ्या वस्तूंवर २५% आयात शुल्क (tariffs) लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच रशियाकडून तेल आणि शस्त्र खरेदी केल्याबद्दल ‘अतिरिक्त दंड’ लावण्याची घोषणा केल्याने भारताच्या आर्थिक वृद्धी आणि निर्यातीवर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हा निर्णय १ ऑगस्टपासून लागू होणार आहे, असे ट्रम्प यांनी Truth Social या त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितले. या निर्णयामुळे भारतीय शेअर बाजारातही घसरण झाली.
रेटिंग एजन्सी ICRA ने भारताचा GDP अंदाज ६.५% वरून ६.२% पर्यंत खाली आणला आहे. ब्रोकरेज कंपनी नोमुरा म्हणते की, यामुळे भारताच्या GDP ला ०.२% टक्क्यांचा फटका बसू शकतो.
या टॅरिफमुळे भारतातील वस्त्र, औषधे, सागरी उत्पादने, ऑटोमोबाईल्स यासारख्या निर्यातीवर परिणाम होऊ शकतो. भारताने अमेरिकेसोबत व्यापार सौद्यांसाठी काही वस्तूंवरील शुल्क कमी केले होते, परंतु $४५ अब्जचा व्यापारतूट अमेरिकेच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे.
भारताने या घोषणेबाबत अभ्यास सुरू केल्याचे वाणिज्य मंत्रालयाने सांगितले आहे. वाढीव टॅरिफ हि भारताच्या परराष्ट्र धोरणाची मोठी चूक असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. भारत-अमेरिका दरम्यान व्यापार वाटाघाटी सुरूच राहणार असून, उर्वरित शुल्क १५-२०% दरम्यान राहू शकते असा अंदाज व्यक्त होत आहे.