अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातील उत्पादनांवर २५ टक्के आयातशुल्क लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशात राजकीय भूकंप झाला आहे. ट्रम्प यांनी रशियाकडून कच्चं तेल व लष्करी सामुग्री आयात करत असल्याच्या कारणावरून भारताला आर्थिक दंड ठोठावला आहे. या निर्णयावर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.
संजय राऊत म्हणाले, “ज्यांना मोदी प्रिय मित्र म्हणतात, त्या ट्रम्पनीच भारतावर सर्वात जास्त टेरिफ लावलं आहे. रशियाशी संबंध ठेवले म्हणून ट्रम्पने भारताला दंडीत केलंय. पण या सरकारची जीभ लुळी पडली आहे, मोदी, अमित शाह, जयशंकर कुठेच दिसत नाहीत.”
ते पुढे म्हणाले, “हे सरकार फक्त भाषणांमध्ये झगमगतं, पण आंतरराष्ट्रीय दबाव आला की अदृश्य होतं. ट्रम्प पाकिस्तानचं कौतुक करत आहेत, तिथल्या तेलाच्या संदर्भात करार करत आहेत. उद्या भारताने पाकिस्तानकडून तेल घ्यावं, अशी परिस्थिती ट्रम्प निर्माण करत आहेत, हे सगळं मोदी सरकारच्या अपयशाचं फलित आहे.”

राऊतांनी संसदेत केलेल्या भाषणात हा मुद्दा उपस्थित करत गृहमंत्री अमित शाह यांना राजीनामा देण्याची मागणीही केली. “आता ट्रम्पने भारताचा आर्थिक कणा मोडण्याचा प्रयत्न केला आहे. मोदी सरकार यात काहीही बोलायला तयार नाही. अंधभक्त, हिंदुत्ववादी, आणि राष्ट्रभक्त सilent झालेत,” असा टोलाही राऊतांनी लगावला.
“मोदी सरकारने आता आत्मचिंतन करावं. पंतप्रधान पदावर राहण्याचा त्यांना अधिकार आहे का, याचा विचार त्यांनी करावा. देशाला आता सुज्ञ आणि सक्षम नेतृत्वाची गरज आहे. मोदींचं ओझं देशाला नको वाटायला लागलंय. ही भावना आता भाजपच्या अंतर्गतही आहे,” असं म्हणत त्यांनी मोदींना थेट लक्ष्य केलं.
राऊतांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ट्रम्पच्या टेरिफ निर्णयाने भारत-अमेरिका संबंधांवर आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.