शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप करत, त्यांच्या वागणुकीमधील “अहसानफरामोशी”वर टीकेचा भडिमार केला आहे. ‘नरकातला स्वर्ग’ या त्यांच्या नवीन पुस्तकाच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते.

राऊत म्हणाले, “या पुस्तकात मी काही धक्कादायक अनुभव मांडले आहेत. मला तुरुंगात 100 दिवसांपेक्षा अधिक काळ ठेवण्यात आले, त्या काळात मी अनेक गोष्टींचा पुनःआठव केला. मी प्रत्यक्ष साक्षीदार राहिलो आहे अशा अनेक घटनांचा यात उल्लेख केला आहे. ज्या लोकांना संकटाच्या वेळी मदत केली गेली, त्यांनीच आमच्यावर अन्याय केला.”
त्यांच्या मते, बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे दोघेही संकटात असलेल्या लोकांना मदत करण्यासाठी कधीही राजकारण आडवे आणत नसत. “महाराष्ट्रातील हे दोन मोठे नेते नेहमीच माणुसकीच्या मूल्यांना प्राधान्य देणारे होते. पण ज्यांना त्यांनी संकटात हात दिला, त्यांनीच नंतर त्यांचाच पक्ष तोडण्याचा कट रचला,” असं राऊत म्हणाले.
राऊतांनी स्पष्ट केलं की, “मी काही गुपित उघड केलेलं नाही, पण काही संदर्भ देऊन मांडणी केली आहे. अनेक घटना अशा आहेत ज्या गुप्त ठेवणंच योग्य आहे. मात्र मी जे अनुभवलं, पाहिलं, त्यातून काही दाखले पुस्तकात दिले आहेत. मी 30-35 वर्षांपासून राजकारणाच्या जवळून साक्षीदार आहे.”
त्यांनी अजूनही जोर देऊन सांगितलं की, “शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष केवळ विचारांवर उभे आहेत. पण या पक्षांना संपवण्यासाठी एकप्रकारची रणनीती राबवण्यात आली. लोक फोडले गेले, संघटना फोडली गेली. उपकारांबद्दल कृतज्ञ राहण्याऐवजी अपकार करून त्याची परतफेड करण्यात आली. हीच खंत या पुस्तकातून मांडली आहे.”
राऊत यांनी आपल्या अनुभवांवर आधारित पुस्तकातून दिलेल्या या विधानांनी पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय निर्माण केला आहे. त्यांच्या मते, ‘नरकातला स्वर्ग’ हे केवळ आत्मकथन नसून, एक दस्तऐवज आहे जो राजकारणात होणाऱ्या बदलांची आणि विश्वासघातांची साक्ष देतो.