बीड जिल्ह्यात संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना जेलमध्ये मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. बीडच्या कारागृहात असलेल्या या दोघांना महादेव गिते आणि अक्षय आठवले यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.

या घटनेवर मराठा आरक्षणासाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, या प्रकाराबाबत आपल्याकडे कोणतीही ठोस माहिती नाही. जेल प्रशासनाकडे यासंबंधीची सविस्तर माहिती असणार असल्याचे त्यांनी म्हटले.
जरांगे पाटील पुढे म्हणाले, “हे खरे आहे की अफवा? हे तपासून पाहणे गरजेचे आहे. आरोपी काही वेळा सहानुभूती मिळवण्यासाठी असे प्रकार घडवून आणू शकतात. त्यामुळे याबाबत अधिकृत माहिती मिळाल्याशिवाय कोणतीही भूमिका मांडणे योग्य ठरणार नाही.”
त्यांनी यावेळी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना तातडीने फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणीही केली.
दरम्यान, या हत्याप्रकरणात सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार वाल्मिक कराडला या गुन्ह्याचा मुख्य सुत्रधार म्हटले आहे. सध्या या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.