महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून, शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हातात बेड्या घालून अधिवेशनात पोहोचले. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या कृतीमागील कारण स्पष्ट केले.

आव्हाड म्हणाले, “देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आक्रमण सुरू आहे. सरकार विरोधी आवाज दडपण्यासाठी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करत आहे. याच अन्यायाचा निषेध म्हणून मी हातात बेड्या घालून आलो आहे.”
त्यांनी अमेरिकेत भारतीयांवर होणाऱ्या अन्यायावरही भाष्य केले. “अमेरिकेतील नवीन व्हिसा धोरणांमुळे अनेक कुटुंबं उद्ध्वस्त होत आहेत. भारतीयांना जबरदस्तीने मायदेशी पाठवलं जातं, त्यांना अमानुष परिस्थितीत ठेवण्यात येतं. महाराष्ट्रातील अनेक कुटुंबं यामुळे त्रस्त आहेत. जर आपण अमेरिकेच्या अन्यायाविरोधात आवाज उठवला नाही, तर ते आणखी अन्याय करतील,” असे आव्हाड म्हणाले.
यावेळी त्यांनी गांधी हत्येच्या पार्श्वभूमीवरही सरकारवर प्रश्न उपस्थित केला. “नथुराम गोडसेने हत्या केली, पण तो विचार कुणाचा होता? हा प्रश्न सरदार वल्लभभाई पटेल यांनी विचारला होता. आजही काही लोक अशाच प्रवृत्तीचे समर्थन करत आहेत,” अशी टीका त्यांनी केली.
आव्हाड यांच्या या कृतीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून, विरोधक आणि सरकारच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.