जळगावात नुकत्याच पार पडलेल्या खानदेश महोत्सवात अभिनेत्री अलका कुबल यांनी आपल्या भावना खुलेपणाने व्यक्त करत उपस्थितांची मने जिंकली. ‘उडान दिव्यांग फाउंडेशन’च्या विशेष विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्यप्रस्तुतीमुळे त्या इतक्या भारावल्या की त्यांचे डोळे पाणावले. ही सादरीकरण पाहून त्या म्हणाल्या, “ही मुलं देवाची देणगी आहेत. त्यांच्यामागे उभे असलेले पालक आणि शिक्षक खरोखर कौतुकास्पद आहेत.”

या कार्यक्रमात बोलताना अलका कुबल यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचीही थोडक्यात झलक दिली. त्यांनी सांगितले की, ‘माहेरची साडी’ चित्रपटामुळे त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली आणि त्यानंतर त्यांच्या सासरच्यांनी त्यांना कधीच एकटी पडू दिलं नाही. त्या म्हणाल्या, “मी तब्बल ११ महिने शूटिंगमध्ये व्यग्र असायचे, पण माझ्या सासूबाईंनी घराची जबाबदारी लिलया पेलली. त्यामुळेच मी करिअरवर लक्ष केंद्रीत करू शकले.”
त्यानंतर शिक्षण व्यवस्थेबद्दल बोलताना त्यांनी सरकारकडे एक महत्त्वाची मागणी केली. “हुशार पण आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना मदतीची गरज आहे. मेरिट बघून, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहकार्य मिळालं पाहिजे. आज एका विद्यार्थिनीची फी दीड कोटी रुपये आहे, जी सर्वसामान्य रिक्षावाल्याला परवडणारी नाही. त्यामुळे शासनाने अशा गुणवंत मुलांना प्रोत्साहन द्यावं,” असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.
अभिनेत्रीने यावेळी विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाचंही कौतुक केलं. त्या म्हणाल्या, “अशा ऐतिहासिक चित्रपटांचं समाजमनावर सकारात्मक प्रभाव पडतो. उपदेश न देता, इतिहासातून शिकवण दिली जाते, हे या कलाकृतीचं यश आहे.”
शेवटी, महाराष्ट्र सरकारच्या ‘लाडकी बहीण योजने‘बद्दल मत मांडताना अलका कुबल म्हणाल्या, “महायुती सरकार महिलांसाठी अतिशय उत्तम काम करत आहे. ही योजना स्त्रियांसाठी आश्वासक आहे. अशा उपक्रमांना माझा पूर्ण पाठिंबा आहे.”
लवकरच अलका कुबल ‘वजनदार‘ या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.