ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडत स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली आहे. “माझं राजकारण संपलं तरी चालेल, पण मी पवारांसमोर कधीच झुकणार नाही,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

माण तालुक्यातील आंधळी येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना गोरे यांनी पवारांवर निशाणा साधला. “मी मंत्री झालो हे शरद पवारांना अजूनही पचलेलं नाही. साध्या कार्यकर्त्यांपासून मंत्रीपदापर्यंत पोहोचणं त्यांना मान्य नाही. आमदारकी मिळाली तेव्हा दहा वर्षं त्यांनी ते स्वीकारलं नाही. आता मंत्री झालोय, हेही त्यांना मान्य नाही,” असं गोरे यांनी सांगितलं.
त्यांनी असंही स्पष्ट केलं की बारामतीसमोर झुकून जर राजकारण केलं असतं, तर आमदारकी मिळणं सोपं झालं असतं. मात्र, त्यामुळे माण-खटावसारख्या भागात विकास झाला नसता. “मी बारामतीच्या पुढे झुकलो असतो, तर आपल्या शेतात पाणी आलं नसतं. गुलामगिरी स्वीकारली असती, तर तालुक्याला पाणी मिळालं नसतं,” असं त्यांनी ठणकावलं.
जयकुमार गोरे यांनी असंही स्पष्ट केलं की त्यांचा वैयक्तिक विरोध शरद पवार किंवा बारामतीला नाही, पण ज्यांनी त्यांच्या मतदारसंघाला पाण्यापासून वंचित ठेवलं, त्यांच्याविरोधात त्यांचा संघर्ष सुरू राहील. “मी माझ्या माणसांसाठी लढतोय आणि लढत राहणार,” असं म्हणत त्यांनी आपल्या भूमिकेवर शिक्कामोर्तब केलं.
गोरे यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून आगामी राजकीय हालचालींवर सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.