महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा उलथापालथीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. मात्र, पाटील यांनी या भेटीबाबत खुलासा करत कोणत्याही राजकीय चर्चांना थेट उत्तर दिले आहे.

कशामुळे झाली भेट?
जयंत पाटील यांनी समाज माध्यमावर पोस्ट करत सांगितले की, ही भेट पूर्णतः प्रशासनिक कारणांसाठी होती. सांगली जिल्ह्यातील महसूल आणि भूसंपादनाशी संबंधित काही प्रलंबित प्रश्न घेऊन ते बावनकुळे यांना भेटायला गेले होते. त्यांनी सांगितले की, ही भेट सोमवारी संध्याकाळी 7:50 वाजता झाली आणि ती अवघ्या 25 मिनिटांची होती.
त्यांनी सांगली जिल्ह्यातील काही महसूल प्रश्नांबाबत 10-12 निवेदनं बावनकुळे यांच्याकडे सादर केली. यात आष्टा येथील जमीन विवाद, तहसील कार्यालयाची समस्या, चांदोली-वारणा धरणग्रस्तांचे प्रश्न, तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाशी संबंधित मुद्द्यांचा समावेश होता.
राजकीय चर्चा फेटाळली
गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र, या भेटीवरून नवीन राजकीय समीकरणे तयार होत असल्याचे बोलले जात असताना पाटील यांनी स्पष्ट शब्दांत यास नकार दिला.
“मी एक आमदार म्हणून प्रशासनाशी संबंधित कामांसाठी मंत्र्यांना भेटलो, यात काही गैर नाही. मात्र, माध्यमांमध्ये याबाबत चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत, हे दुर्दैवी आहे,” असे त्यांनी नमूद केले.
बावनकुळे यांचीही प्रतिक्रिया
चंद्रशेखर बावनकुळे यांनीही ही भेट प्रशासनिक कारणांसाठीच होती, असे स्पष्ट केले आहे. मात्र, या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
राजकीय वर्तुळात या भेटीचे वेगवेगळे अर्थ लावले जात असताना, जयंत पाटील यांनी स्वतःच खुलासा करून यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, आगामी काळात कोणते राजकीय समीकरण बदलते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.