जम्मू-काश्मीरमधील शांततेने नटलेल्या पहलगाम भागात भीषण दहशतवादी हल्ला घडला आहे. या हल्ल्यात २७ पर्यटकांचे प्राण गेले असून, महाराष्ट्रातील दोन नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दिलीप डिसले आणि अतुल मोने अशी मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. तसेच, या घटनेत महाराष्ट्रातील आणखी दोन व्यक्ती जखमी झाल्याचेही स्पष्ट झाले आहे.

या हल्ल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. “पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत,” असे फडणवीस यांनी सांगितले. तसेच, “जखमी पर्यटकांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी,” अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिदरी यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली आहे. स्थानिक प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जखमींमध्ये पनवेलचे माणिक पटेल आणि एस. भालचंद्रराव यांचा समावेश आहे. सुदैवाने दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या हल्ल्याचा निषेध करताना पाकिस्तानवर टीका केली. “ही कृत्ये भ्याडपणाचे द्योतक आहेत. निरपराध पर्यटकांवर गोळ्या झाडण्यात कोणती शौर्यगाथा आहे? या पाकड्यांना सडेतोड उत्तर दिले जाईल,” असे ते म्हणाले.
यावेळी शिंदे यांनी महाराष्ट्रातील जखमी नागरिकांसोबत थेट संपर्क साधल्याचेही सांगितले. “प्रगती जगदाळे या मुलीने सांगितले की, दहशतवाद्यांनी नाव विचारून तिच्या वडिलांवर आणि काकांवर गोळ्या झाडल्या. मी तिला धीर दिला असून, सर्व मदत पुरवली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, महाराष्ट्र सरकारने या पर्यटकांना लवकरात लवकर महाराष्ट्रात परत आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्र सरकारकडूनही तातडीची कारवाई सुरू असून, गृहमंत्री अमित शाह यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी स्वतः घटनास्थळी भेट देण्याचे नियोजन केले आहे.
या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाचे वातावरण पसरले आहे. शहीद झालेल्या पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. सरकारने मृतांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.