छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगजेबाच्या कबरीसंदर्भात मनसेने पोस्टरबाजी करत जनतेचे लक्ष वेधले आहे. शहरातील विविध प्रमुख ठिकाणी हे पोस्टर्स लावण्यात आले असून, त्यावर “औरंगजेब इथेच गाडला…” असे स्पष्टपणे नमूद आहे. या बॅनर्सच्या माध्यमातून खुलताबादमधील कबरीचे स्थान आणि तेथील अंतर दाखवण्यात आले आहे.

पोस्टरबाजीमागचा हेतू
मनसेने क्रांती चौक, जिल्हा न्यायालय, बाबा पेट्रोल पंप, होली क्रॉस शाळा, नगर नाका, पडेगाव आणि शरणपूर यांसारख्या भागांत हे पोस्टर्स लावले आहेत. या पोस्टर्समध्ये संबंधित ठिकाणांपासून खुलताबादपर्यंतचे अंतर स्पष्टपणे दाखवण्यात आले आहे. उदाहरणार्थ, क्रांती चौकापासून 27 किमी, जिल्हा न्यायालयापासून 26 किमी, आणि पडेगावपासून 21 किमी असे अंतर नमूद आहे.
मनसेची भूमिका आणि मागण्या
गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून देशभरात वाद सुरू असून, मनसेनेही या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितले होते की, मराठ्यांचा नाश करण्याच्या हेतूने आलेल्या औरंगजेबाला याच भूमीत गाडण्यात आले. त्यामुळे हा इतिहास प्रत्येक मराठी माणसाला आणि विशेषतः तरुण पिढीला माहिती असणे आवश्यक आहे.
यापूर्वीही मनसेने औरंगजेबाच्या कबरीच्या देखभालीसाठी सरकारी निधी खर्च न करण्याची मागणी केली होती. तसेच, शाळेतील विद्यार्थ्यांना तेथे अभ्यास दौऱ्यावर नेऊन इतिहासाची माहिती देण्याची सूचनाही पक्षाकडून करण्यात आली होती. या नव्या पोस्टरबाजीमुळे औरंगजेबाच्या कबरीसंदर्भातील चर्चा अधिकच पेटण्याची शक्यता आहे.