राजकारणात अनेकदा घडणाऱ्या भेटी या ‘अराजकीय’ म्हटल्या जातात, पण त्या मागे काही गंभीर घडामोडी सुरू असतात हे उघड गुपितच आहे. मंगळवारी शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेतली. ही भेट अचानक झाली असली, तरी ती निव्वळ औपचारिक होती, असं सांगितलं गेलं. मात्र या भेटीमागे आगामी मुंबई महापालिका निवडणुकांचं पार्श्वभूमीवर राजकीय गणित आखलं जात असल्याचं संकेत मिळत आहेत.

ही चौथी वेळ होती की उदय सामंत आणि राज ठाकरे एकमेकांना भेटले. या वेळी सामंत यांनी हातात बुके घेतले होते, पण दरवाज्याआड झालेल्या चर्चेनंतरच तो दिला गेला. यावरून हे लक्षात येतं की यावेळी औपचारिकतेपेक्षा चर्चेला प्राधान्य देण्यात आलं. “ती चूक पुन्हा नको,” असं म्हणत आधी संवाद आणि मगच बुके देण्याचा निर्णय घेतल्याचं समजतं.
अर्धा तासाच्या या भेटीत काय झालं, यावर दोन्ही नेत्यांनी फारसा प्रकाश टाकलेला नाही. मात्र मागील विधानसभा निवडणुकीत मनसे आणि शिंदे गटामध्ये योग्य समन्वय न झाल्याने काही जागांवर मतविभाजन झालं होतं. त्यामुळे या वेळी मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वीच स्पष्ट चर्चा करून योग्य जागा वाटपाचा विचार केला जात असल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे.
यावेळी उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही भेट पूर्णतः अराजकीय असल्याचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, “मी त्या भागात काही कामासाठी गेलो होतो, आणि सहज राज ठाकरे यांना भेटायचं ठरवलं. त्यांनीही वेळ दिला. आम्ही चहा घेतला, खिचडी खाल्ली आणि गप्पा मारल्या.” मात्र इतक्यावरच ही भेट मर्यादित होती का, हा खरा प्रश्न आहे.
मनसेचे ज्येष्ठ नेते संदीप देशपांडे देखील या भेटीत उपस्थित होते. त्यांनीही सामंत यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला आणि भेटीचे स्वरूप अराजकीय असल्याचे सांगितले. मात्र अशा भेटींच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांचा उगम होणं अपरिहार्य आहे.
राज ठाकरे यांच्या कार्यशैलीत नेहमीच विचारपूर्वक निर्णय घेण्याची पद्धत दिसून आली आहे. मुंबईच्या विकासाबाबत त्यांचं एक वेगळं व्हिजन आहे, आणि ते जाणून घेण्यासाठीच ही भेट होती, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. मात्र ही भेट केवळ सामाजिक किंवा वैयक्तिक असल्याचं सांगून त्यामागे राजकीय संकेत लपवता येणार नाहीत.
जसजसे महापालिका निवडणुकीचे वारे जोर पकडतील, तसतशी अशी अराजकीय भेटींची राजकीय छाया वाढत जाणार हे निश्चित!