शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्ली दौऱ्यादरम्यान घेतलेल्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत म्हटलं की, मोदी संपूर्ण जगात फिरतात, पण भारताला एकही खरा मित्र देश मिळालेला नाही. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याचे महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी कडाडून उत्तर दिलं आहे.

बावनकुळे म्हणाले, “उद्धव ठाकरे यांना वास्तव दिसत नाही, त्यांचा चष्म्याचा नंबर बदलावा लागेल. मोदींनी जागतिक स्तरावर भारताची ओळख निर्माण केली आहे. त्यांनी योग दिनाला जागतिक मान्यता मिळवून दिली. दहशतवादाविरोधात जागतिक लढा उभारला आणि आज संपूर्ण जग त्यांच्या पाठीशी उभं आहे.” ते पुढे म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी दुसऱ्यांवर टीका करण्याऐवजी स्वतःचा पक्ष सांभाळावा. रोज त्यांच्या पक्षाचे नेते शिंदे गटात जात आहेत हे त्यांना दिसत नाही.”
दरम्यान, शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर बावनकुळे यांचे परस्परविरोधी वक्तव्य चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यांनी प्रथम जाहीर केलं की कर्जमाफीसाठी समिती कार्यरत आहे, परंतु नंतरच त्यांनी म्हटलं की ही समिती अजून स्थापन व्हायची आहे आणि त्यासाठी माजी सनदी अधिकाऱ्यांची मदत घेतली जाईल. त्यामुळे सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. भाजपने निवडणुकीत शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, मात्र आता केवळ वेळकाढूपणा सुरू असल्याचं आरोप होत आहेत.
उद्धव ठाकरे यांनीही मोदींवर जोरदार हल्ला करत म्हटलं, “देशाला पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री लागतात, केवळ प्रचार करणारे नाहीत. ऑपरेशन सिंधूरनंतर मोदी बिहारला गेले, पण काश्मीरला गेले नाहीत. देशाचं परराष्ट्र धोरण दिशाहीन आहे.” त्यांनी ट्रम्प टॅरिफ, चीनशी संबंध, आणि शेतकरी धोरणावरूनही केंद्र सरकारवर टीका केली. “मोदींचा खरा चेहरा आता उघड होत आहे,” असं ठाकरे यांनी म्हटलं.