जालना जिल्ह्यातील राजकारणात मोठी खळबळ उडवत काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. गोरंट्याल यांनी स्पष्ट केलं की, अनेक दिवसांपासून भाजप प्रवेशाचा विचार सुरू होता, पण योग्य मुहूर्त मिळत नव्हता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केल्याचं सांगितलं.
या प्रवेशानंतर त्यांच्या कट्टर विरोधक शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. खोतकर म्हणाले की, “या महाशयांनी मला पूर्वी गद्दार म्हटलं होतं, पण काँग्रेसने एवढे वर्ष आमदारकी देऊनही त्यांनी पक्ष सोडला. मग खरी गद्दारी कोणी केली?” तसंच खोतकरांनी आरोप केला की, “नगरपालिकेच्या चौकशीत नाव आल्यानंतर भ्रष्टाचार झाकण्यासाठीच भाजपमध्ये प्रवेश केल्याचा हा डाव आहे.”
गोरंट्याल यांनी भाजप प्रवेशाच्या वेळी सांगितलं की, काँग्रेसमध्ये असतानाही रावसाहेब दानवे, अतुल सावे यांच्याशी मैत्री होती. मात्र, आमदार असतानाही मंत्रीपदासाठी त्यांच्या नावाचा विचार झाला नाही. “फक्त तिकीट देऊन उपयोग नाही, योग्य रणनीती हवी असते,” असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला. त्यांनी काँग्रेसमध्ये तिकीट वाटपात झालेल्या चुकांचाही उल्लेख करत काँग्रेसच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली.

भाजपमध्ये प्रवेश करताना गोरंट्याल यांनी दावा केला की, “जालन्याचा पुढचा महापौर भाजपचा होणारच.” त्यांनी पक्षात निष्ठा व्यक्त करत सांगितलं की, “मी शिंदेगटात नाही, थेट भाजपमध्येच आहे.” यावेळी त्यांनी भाजप नेते दानवे, लोणीकर, सावे यांच्याशी असलेल्या मैत्रीचाही उल्लेख केला.
या राजकीय घडामोडींमुळे जालन्यात आगामी निवडणुकांपूर्वी राजकीय रंगत चांगलीच वाढली आहे. गोरंट्याल यांच्या प्रवेशाने भाजप मजबूत होणार का, की विरोधकांमध्ये नव्या संघर्षाची ठिणगी पडणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.