मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गंगा जलावर दिलेल्या वक्तव्यावरून राजकीय वादंग पेटला असून, सत्ताधारी पक्षाने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मात्र, या टीकेला प्रत्युत्तर देताना मनसे नेते अविनाश जाधव यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

जाधव म्हणाले, “गंगा स्वच्छ करण्याच्या नावाखाली 20 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला. हा भाजपचाच घोटाळा असून, त्यांनीच यासाठी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. भाजपने आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. जे बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळातही शक्य झालं नाही, ते राज ठाकरेंनी करून दाखवलं आहे. त्यांनी मशिदीवरील भोंगे हटवले आणि हिंदुत्वाची ठाम भूमिका घेतली आहे.”
त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, “राज ठाकरेंना गंगेच्या स्नानाला विरोध नाही, पण गंगेत टाकली जाणारी घाण आणि त्याच्या साफसफाईवर होणारा भ्रष्टाचार यावर ते प्रश्न उपस्थित करत आहेत. भाजप गंगेच्या स्वच्छतेसाठी खर्च झालेल्या कोट्यवधींच्या घोटाळ्यावर पडदा टाकण्यासाठी राज ठाकरेंच्या वक्तव्यावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे.”
नितेश राणेंवर निशाणा
यावेळी त्यांनी भाजप नेते नितेश राणे यांनाही लक्ष्य करत टोला लगावला. “राज ठाकरे केवळ हिंदुत्वाच्या मुद्यावरच बोलत नाहीत, तर मशिदीवरील भोंगे आणि रस्त्यावर होणाऱ्या नमाजाबद्दलही त्यांनी भाष्य केलं आहे. जर नितेश राणेंना शंका असेल, तर मी त्यांना राज ठाकरेंची भाषणे पाठवू शकतो,” असा उपरोधिक इशारा त्यांनी दिला.
आनंद आश्रम प्रकरणावर मतप्रदर्शन
ठाण्यातील आनंद आश्रम संदर्भातही त्यांनी भाष्य करत म्हटलं, “दिघे साहेब झोपडीत राहून जनतेसाठी कार्य करत होते. मात्र, आता त्यांच्या नावावर राजकारण करून तिथे कोट्यवधी रुपये खर्च करून आरामदायी खोल्या बांधल्या जात आहेत. हा निधी गरजूंवर खर्च व्हायला हवा.”