राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी अलीकडेच औरंगजेबाच्या कबरीसंदर्भात एक नवा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी खुलताबाद या ठिकाणाचं नाव बदलून ‘रत्नपूर’ असं ठेवण्याची मागणी केली. त्यांच्या मते, औरंगजेबाच्या काळात अनेक ठिकाणांची नावं बदलण्यात आली होती आणि तीच चूक आता सुधारली पाहिजे.

शिरसाट म्हणाले, “औरंगजेबाच्या कबरीसाठी प्रसिद्ध असलेलं खुलताबाद पूर्वीच्या काळात रत्नपूर म्हणून ओळखलं जायचं. इंग्रजांच्या आधी या भागाला हेच नाव होतं. आमचा उद्देश कोणाची मालमत्ता काढून घेण्याचा नाही, तर आपली सांस्कृतिक ओळख पुन्हा प्रस्थापित करण्याचा आहे.”
तसेच, त्यांनी दौलताबादचं मूळ नाव ‘देवगिरी’ असल्याचंही सांगितलं आणि ते नाव देखील पुन्हा वापरण्याची मागणी त्यांनी मांडली. ते म्हणाले की हा प्रस्ताव मुख्यमंत्री आणि विधानसभेत मांडण्यात येणार आहे.
यावर AIMIMचे खासदार इम्तियाज जलील यांनी थेट आणि आक्रमक प्रतिसाद दिला आहे. त्यांनी विचारलं, “जर शहरांची, रस्त्यांची नावं बदलणं चालूच आहे, तर मग तुमच्या वडिलांचंही नाव बदला ना! तुमचं अजून काय बाकी आहे बदलायला?”
ते पुढे म्हणाले, “तुम्ही इथे अहमदनगरचं नाव बदलायला निघाला आहात, पण गुजरातच्या अहमदाबादला काही करू शकत नाही. मोदी आणि अमित शहा यांना जाऊन विचारा की अहमद नाव बरं वाटतं का? नाव बदलणं हे काही विकासाचं काम नाही. जे राजकारणाच्या खालच्या स्तरावर जातात, तेच अशा मागण्या करतात.”
जलील यांनी शिवसेनेवर टीका करत स्पष्ट केलं की खऱ्या विकासासाठी नावांच्या बदलापेक्षा भक्कम धोरणं गरजेची आहेत. “जग पुढे जातंय आणि हे लोक अजूनही जुन्याच वादांमध्ये अडकले आहेत,” असं ते म्हणाले.