जळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते गिरीश महाजन आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय संघर्ष आता आणखी गडद झाला आहे. काही दिवसांपूर्वी खडसे यांनी महाजनांवर एका आयएएस महिला अधिकाऱ्याशी कथित संबंध असल्याचा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणात आता गिरीश महाजन यांनी थेट कायदेशीर पावलं उचलली आहेत.

महाजनांची अब्रुनुकसानीची नोटीस
खडसे यांच्या आरोपांनंतर गिरीश महाजन यांनी अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे. खडसे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वैयक्तिक प्रतिमा मलिन झाल्याचा दावा करत, महाजनांनी ही नोटीस दिली असून यानंतर कायदेशीर कारवाईचा मार्ग त्यांनी स्वीकारलेला आहे. या नोटिशीत नेमकं काय नमूद करण्यात आलं आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, मात्र खडसे यांना आता याचे उत्तर द्यावे लागणार आहे.
खडसे काय म्हणाले होते?
एका पत्रकाराचा संदर्भ देत खडसे यांनी महाजन यांच्यावर आरोप केला होता की, त्यांचे एका महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबंध आहेत. इतकंच नव्हे, तर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचाही उल्लेख केला होता. त्यांनी दावा केला की, मंत्रिमंडळ विस्ताराच्या काळात शाहांनी महाजनांना बोलावून या बाबत विचारणा केली होती आणि कॉल डिटेल्सही त्यांच्या हाती आहेत, असे खडसे यांनी सांगितले होते.
महाजनांचा कडवा प्रतिआक्षेप
खडसेंच्या आरोपानंतर गिरीश महाजन यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले आणि स्पष्टपणे सांगितले की, हे आरोप सिद्ध झाले तर आपण राजकारणातून निवृत्त होईन. त्यांनी खडसेंना इशारा देत म्हटलं की, “माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्यांना मी बोलायला लागलो तर त्यांना घरातून बाहेर पडणं कठीण जाईल.”
आता काय?
महाजनांच्या या कायदेशीर पावल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. खडसे यांचे पुढील पाऊल काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राजकीय वादाची ही लढाई न्यायालयात जाईल की राजकीय चर्चेतच राहील, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.