कोकणातील काँग्रेस नेते सहदेव बेटकर यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटात प्रवेश केला. मातोश्री निवासस्थानी झालेल्या एका छोटेखानी समारंभात ठाकरे यांनी त्यांचे औपचारिक स्वागत केले. यावेळी उपस्थित असलेल्या खासदार संजय राऊत यांनी भावनिक आणि राजकीय संदेश देणारे भाषण केलं.

राऊत म्हणाले, “महाभारतात श्रीकृष्ण, संजय आणि सहदेव यांची भूमिका महत्त्वाची होती, तसेच या ठिकाणी उद्धव हे श्रीकृष्ण, मी संजय आणि सहदेव हे आपले नवे योद्धा आहेत. कोकणात महायुद्ध सुरू झाले असून हे युद्ध आपण नक्की जिंकू.”
कोकणातील बदलत्या राजकीय वाऱ्यांबाबत बोलताना राऊत म्हणाले, “बाहेर हवा बदलते आहे. उद्धवजी, तुम्ही कोकणात फक्त एक पाऊल ठेवा, मग पाहा कशी राजकीय दाणादाण उडते. एकही गद्दार तिकडे राहणार नाही.”
सहदेव बेटकर यांनीही आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं, “मी 1992 साली मातोश्रीवर आलो होतो आणि आज पुन्हा आपल्या घरी परतल्यासारखं वाटतंय. माझं हे पुनरागमन आहे.”
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात सहदेव बेटकर यांचा उल्लेख करत म्हणाले, “सहदेवचा आवाज तळ कोकणापर्यंत गेला असावा. लोकसभेपासून विधानसभेपर्यंत कोकणात निकाल सर्वांनाच धक्का देणारे ठरणार आहेत. शिवसेना हा शब्दाला जागणारा एकमेव पक्ष आहे आणि महाराष्ट्राला अशाच पक्षाची गरज आहे.”
या प्रवेशामुळे कोकणातील राजकारण पुन्हा तापू लागलं असून आगामी निवडणुकांसाठी हा एक नवा टप्पा ठरू शकतो.