उन्हाळा आणि आंबा हे समीकरण तितकंच गोड! कोकणातील देवगड व रत्नागिरीचा हापूस आंबा केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात आणि परदेशातसुद्धा मोठ्या कौतुकाने खाल्ला जातो. आता हा खास हापूस आंबा दिल्लीतील नागरिकांनाही चाखायला मिळणार आहे. राजधानी दिल्लीत 30 एप्रिलपासून ‘आंबा महोत्सव’ाचे आयोजन करण्यात आले असून, याचे उद्घाटन खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

उद्घाटन सोहळा 30 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 वाजता
दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये होणाऱ्या या दोन दिवसीय महोत्सवाचा शुभारंभ 30 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता होणार आहे. खासदार रविंद्र वायकर यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून हा महोत्सव साकारत आहे. या उपक्रमामागे उद्दिष्ट आहे – कोकणातील शेतकऱ्यांना थेट राष्ट्रीय पातळीवर बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या उत्पादनांना अधिक चांगली किंमत मिळवून देणे.
हापूससह कोकणच्या इतर उत्पादनांची चवही मिळणार
30 एप्रिल आणि 1 मे, म्हणजेच महाराष्ट्र दिनापर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात फक्त हापूसच नव्हे, तर कोकणातील इतर स्थानिक उत्पादनेही विक्रीसाठी आणि चवण्यासाठी उपलब्ध असणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांचीही रेलचेल असणार आहे, जे या महोत्सवात खास आकर्षण ठरणार आहे.
पंतप्रधान मोदींचा पाठिंबा आणि उपस्थिती
या महोत्सवाची कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडण्यात आली होती, ज्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि उद्घाटनासाठी वेळही दिला. त्यांनीही प्रत्येक राज्याने आपल्या खास फळांना देशभरात प्रसिद्ध करायला हवं, असं मत व्यक्त केलं.
शेतकऱ्यांसाठी नव्या बाजारपेठेचं द्वार उघडणार
खासदार वायकर यांनी सांगितलं की, दिल्लीत कोकणचा हापूस सहज उपलब्ध होत नाही. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना नवी बाजारपेठ मिळावी, यासाठी हा महोत्सव दिल्लीत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांनी सर्व दिल्लीकरांना या महोत्सवाला आवर्जून भेट देऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे.