राज्याचे कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे सध्या गंभीर संकटाचा सामना करत आहेत. नुकत्याच झालेल्या न्यायालयीन निर्णयानुसार त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यामुळे त्यांच्या आमदारकीवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, विरोधकांकडून त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी जोर धरत आहे.

या पार्श्वभूमीवर कोकाटे यांनी सरकारच्या कामकाजावर टीका करत एक धक्कादायक विधान केले आहे. “आमचे पीएस (खासगी सचिव) आणि ओएसडी (विशेष कार्य अधिकारी) हे सुद्धा मुख्यमंत्रीच ठरवतात, आमच्या हातात काहीच नाही,” असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
‘शिस्त पाळा नाहीतर घरी जा!’
एका कार्यक्रमात बोलताना कोकाटे यांनी राज्य सरकारच्या निर्णय प्रक्रियेबद्दल महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. “पहिल्याच दिवशी आम्हाला स्पष्ट इशारा देण्यात आला की, माझ्यासह कोणाच्याही जाण्याने सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे कुणीही फाजील मस्ती करू नये, नाहीतर थेट घरी पाठवले जाल. विभागाचे काम शिस्तबद्धपणे झाले पाहिजे. 100 दिवसांच्या कार्यक्रमाची आखणी केली गेली असून, आम्हाला ठरवून दिलेल्या नियमांप्रमाणेच काम करावे लागेल,” असे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेतीचा सल्ला
कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या अडचणींवरही भाष्य केले. त्यांनी रासायनिक शेतीऐवजी सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा सल्ला दिला. “खत आणि औषधांच्या किमती वाढल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे सेंद्रिय शेतीकडे वळणे हा शेतकऱ्यांसाठी अधिक फायदेशीर पर्याय ठरेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
कायदेशीर लढाई सुरूच
मीडियाशी संवाद साधताना कोकाटे यांनी त्यांच्या आमदारकीबाबत स्पष्ट प्रतिक्रिया देण्याचे टाळले. “सध्या काहीही निश्चित नाही. कायदेशीर प्रक्रियेनुसार पुढील निर्णय घेतला जाईल. मी पात्र आहे की अपात्र, हे न्यायालय ठरवेल,” असे त्यांनी सांगितले.
न्यायालयीन सुनावणी आजच होण्याची शक्यता
कोकाटे यांच्या शिक्षेच्या विरोधात त्यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याची तयारी केली आहे. “20 तारखेला न्यायालयाने निकाल दिला असून, आम्ही आज अपील दाखल करत आहोत. न्यायालयात लवकर सुनावणी झाली, तर आजच यावर निर्णय अपेक्षित आहे,” असे कोकाटे यांचे वकील अविनाश भिडे यांनी स्पष्ट केले.
या संपूर्ण घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, कोकाटे यांच्या भवितव्यावर पुढील काही दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत.