‘छावा’ सिनेमानंतर आता ‘फुले’ या चरित्रपटाभोवतीही वादाचे वळव सुरु झाले आहेत. महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित हा हिंदी सिनेमा 11 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र निर्माण झालेल्या वातावरणामुळे तो आता 25 एप्रिल रोजी प्रदर्शित केला जाणार आहे.

सिनेमात प्रतीक गांधी आणि पत्रलेखा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पण या चित्रपटाच्या संदर्भात अभिनेता किरण माने यांनी फेसबुकवर एक रोखठोक आणि विचार करायला लावणारी पोस्ट लिहिली असून ती सध्या मोठ्या प्रमाणावर शेअर केली जात आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, “फुले” सिनेमाच्या आशयाबद्दल त्यांना शंका वाटतेय. ‘छत्रपती शिवरायांवर आधारित काही चित्रपटांतून सुस्पष्टपणे मुस्लिमविरोधी भावनांचा प्रचार झाला’ असा आरोप त्यांनी केला आहे. अशा प्रकारच्या सिनेमांच्या माध्यमातून लोकांच्या मनात विष पेरण्याचं काम केलं जातंय, असंही ते म्हणाले.
किरण माने पुढे म्हणतात की, “महामानवांवरचे सिनेमे केवळ त्यांच्या चार गुणांचं कौतुक करून लोकांना विश्वासात घेतात, आणि मग त्यामध्ये खोटा इतिहास मिसळतात. ही धोकादायक पद्धत आहे.” ते सिनेमा पाहण्याऐवजी महामानवांवर लिहिलेली खरी पुस्तके वाचण्याचा सल्लाही देतात.
त्यांनी ‘फुले’ सिनेमातील संभाव्य इतिहासविकृतीवर प्रश्न उपस्थित करत, फुलेंनी समाजात केलेल्या खऱ्या कार्याचा उल्लेखही पोस्टमध्ये केला आहे — जसे की शिवजयंतीचा प्रारंभ, बहुजन एकतेसाठी केलेले प्रयत्न, व मुस्लिम समाजाविषयी त्यांनी व्यक्त केलेले सन्मानपूर्ण विचार.
पोस्टच्या अखेरीस किरण माने यांनी लोकांना सावरून राहण्याचं आणि कोणत्याही चित्रपटावर अंधपणे विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे.