पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या खळबळीची धग शांत होण्याआधीच, कल्याणमध्येही तशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कल्याण-पूर्व येथील शक्तीधाम पालिका प्रसूतीगृहात एका गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

शांतीदेवी अखिलेश मौर्य या दोन महिन्यांच्या गरोदर महिलेला गर्भपात आणि कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी ४ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, शस्त्रक्रियेपूर्वीच तिची तब्येत खालावली. इंजेक्शन दिल्यानंतर प्रकृती आणखी बिघडली आणि तिला तातडीने खासगी रुग्णालयात हलवले जात असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला.
या प्रकारानंतर शांतीदेवीच्या पतीने रुग्णालयातील डॉक्टरांवर गंभीर आरोप लावले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच पत्नीचा मृत्यू झाला. त्यांनी डॉक्टरांना जाब विचारला असता, ‘गुटखा खाल्ल्यामुळे तब्येत बिघडली’ असे उत्तर मिळाल्याचे ते सांगतात. मात्र, हे कारण त्यांच्या मते तर्कहीन असून, यामध्ये रुग्णालयाची व्यवस्था आणि डॉक्टरांची निष्काळजीपणा मुख्य कारणीभूत आहे, असा त्यांचा ठाम दावा आहे.
आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शांतीदेवी यांना भूल दिल्यानंतर त्रास सुरू झाला आणि त्यानंतर तातडीने उपचार सुरु केले गेले. मात्र, शक्तीधाम रुग्णालयात आयसीयूची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवावे लागले. दुर्दैवाने वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
सदोष रचना आणि आवश्यक वैद्यकीय सुविधांचा अभाव हे पालिका रुग्णालयांचे वास्तव अधोरेखित करणारे हे आणखी एक प्रकरण आहे. केडीएमसीच्या हद्दीत तीन मॅटर्निटी हॉस्पिटल्स असतानाही, त्यापैकी एकातही ICU नसणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. अशा रुग्णालयांत गंभीर रुग्णांवर उपचार करणे म्हणजे जीवाशी खेळण्यासारखे आहे.
याआधी, डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात देखील अशाच प्रकारे गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता. त्या प्रकरणात दोन डॉक्टरांवर कारवाईही झाली होती. आता पुन्हा अशाच स्वरूपाची घटना समोर आल्याने केडीएमसीच्या आरोग्य सेवांची दुरवस्था स्पष्टपणे दिसून येते.